एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामागची ५ कारणे

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामागे त्यांच्यावर झालेले आरोप हे एकमेव कारण नसून, त्यांचा अतिआत्मविश्वास, सुटलेला संयम आणि पदांची लालसा, ही कारणंही जबाबदार आहेत. 

Updated: Jun 4, 2016, 11:12 PM IST
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामागची ५ कारणे title=

दीपक भातुसे, मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामागे त्यांच्यावर झालेले आरोप हे एकमेव कारण नसून, त्यांचा अतिआत्मविश्वास, सुटलेला संयम आणि पदांची लालसा, ही कारणंही जबाबदार आहेत. 

सरपंच ते विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर महसूलमंत्रीपदासह दहा खात्याचं मंत्रीपद, अशी मागल्या 40 वर्षांत एकनाथ खडसेंनी राजकारणात झेप घेतली. मात्र या प्रवासात राजकारणात ज्या चुका टाळायच्या असतात, नेमक्या त्याच चूका खडसेंच्या हातून होत गेल्या आणि त्याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. 

१९९५ साली शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. तेव्हा खडसे यांच्याकडे, पक्षानं अर्थमंत्री हे महत्त्वाचं खातं सोपवलं. कालांतरानं नितीन गडकरी दिल्लीत गेले. गोपीनाथ मुंडेंचं आकस्मिक निधन झालं आणि राज्याच्या भाजपमध्ये खडसे हे सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना, खडसेंनी विरोधकांवर अनेक आरोप केले. शरद पवारांपासून ते अशोक चव्हाण, अजित पवार यांच्यावर खडसे विधानसभेत कागदपत्रं झळकावत तुटून पडायचे.

खडसेंचे बहुतांश आरोप हे भूखंडांशी संबंधित असायचे. मात्र त्यापैकी एकही खडसे सिद्ध करु शकले नाहीत. २०१४ साली राज्यात भाजपचं सरकार आलं. तेव्हा मुख्यमंत्रीपदावर पहिला दावा एकनाथ खडसेंचा होता. मात्र पक्षानं खडसेंना डावलून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. नाराज झालेल्या खडसेंनी थेट मुख्यमंत्र्यांविरोधातच हत्यार उपसलं होतं. इथूनच खडसेंचा संयम सुटत गेला. त्यानंतर विविध कारणांवरुन त्यांचा मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष होतच राहिला. 

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातले मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही खडसेंचं पटत नव्हतं. जळगावमधले खासदारकीचे प्रबळ दावेदार हरीभाऊ जावळे यांना डावलून, खडसेंनी आपली सून रक्षा यांना खासदारकीची उमेदवारी मिळवून दिली. त्या खासदारही झाल्या. मुलगी रोहिणी खडसे हिला जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्ष केलं. तर दुग्धविकास खातं आपल्याकडेच असताना, खडसेंनी आपल्या पत्नी मंदिकानी खडसे यांना महानंदाचं अध्यक्ष केलं. आपल्या नात्यातल्या आणि निकटवर्तीयांना सत्तेच्या पदाचा खडसे लाभ मिळवून देऊ लागले. मात्र घरातच सगळी पदं गेल्यानं, जळगावमधल्या भाजप पदाधिका-यांमध्ये खडसेंबद्दल नाराजी वाढू लागली. त्यातच खडसेंविरोधात आरोपांची मालिका सुरु झाली. 

खडसेंवरचे आरोप

१. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण 
२. खडसेंचा निकटवर्ती गजानन पाटील याला लाचखोरीत झालेली अटक
३. दाऊदच्या घरून खडसेंच्या मोबाईलवर आलेले कथित फोन 
४. पर्सिसन मच्छीमार संस्थांकडून मासेमारीच्या परवानगीसाठी लाच 
५. जावयाची बेकायदा लिमोझिन कार 

या सगळ्या आरोपांमध्ये खडसेंच्या बाजूनं पक्षातला एकही बडा नेता उभा राहिला नाही. देवेंद्र फडणवीस यांनाही खडसेंनी त्यांच्याविरोधात केलेल्या संघर्षाचा बदला घेण्याची आयती संधी चालून आली. फडणवीसांनी तात्काळ खडसेंसंदर्भातला अहवाल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आणि शेवटी नैतिकतेचा मुद्दा पुढे करत खडसेंना राजीनामा देण्याचे आदेश पक्षानं दिले. राजकारणात ज्या गोष्टी टाळायच्या असतात, त्याच गोष्टी खडसे करत गेले. आणि स्वतःच विणलेल्या जाळ्यात खडसे अडकत गेले.