मुंबईत दरवर्षी ६०० लोकल प्रवासी गमावता जीव

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, September 26, 2013 - 15:38

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘ओव्हरहेड वायर २५ हजार व्होल्टसने चार्ज आहेत, म्हणून गाडीच्या टपावरुन प्रवास करू नये. चालत्या ट्रेनबाहेर शरीर झोकून देणं, फुटबोर्डवर उभं राहणं धोकादायक आहे.’ अशी उद्घोषणा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वारंवार केली जात असते. मात्र, याचा कोणताही परिणाम मुंबईतील तरूण प्रवाशांवर झालेला नाही. चालत्या ट्रेनबाहेर शरीर झोकून देणं, फुटबोर्डवर उभं राहणं आणि स्टंट करण्यानं आपण स्वतःसोबत इतरांचे प्राणही धोक्यात आणतोय याची थोडीही पर्वा या तरूणांना नसते.
‘स्टंट’ करणाऱ्या प्रवांशाविरूध्द वेळोवेळी मोहीम उघडूनही या प्रकारांमध्ये घट झालेली नाही. ट्रेनमधन प्रवास करतांना नियमांचे पालन न करणाऱ्या टपोरी प्रवाशांना नुकतीच मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीसांनी अटक केली.
वर्दळीच्या वेळी छत्रपती शिवाजी स्थानक ते कल्याणदरम्यान १६ लोकल चालवल्या जातात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ९ डब्यांच्या या लोकल १२ डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. तरीही लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांच प्रमाण कमी नाहीय.
लोहमार्ग पोलीसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सन २००५ ते २०१२ दरम्यान चालत्या लोकलमधन पडून पाच हजारांपेक्षा जास्त प्रवांशाचा मृत्यू झाला आणि पंधरा हजार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरवर्षी सरासरी ६३६ प्रवासी ठार तर १८९७ प्रवासी गंभीर जखमी होत असतात.
दरवेळी उद्घोषणा करून देखील प्रवासी याकडे कानाडोळा करीत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितलंय.
सन २०१२ ला ८३४ प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत तर २००६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सन २०११ मध्ये ७३६ ठार तर १९८८ गंभीर जखमी झाले आहेत. ही आकडेवारी बघता सन २०११ च्या तुलनेत सन २०१२ मध्ये मृत्युच्या संख्येत १३ टक्के वाढ दिसते. सन २००६ आणि २००८ यादोन्ही वर्षी ६१५ प्रवासी ठार झाले आहेत. २००७ ला ६४७ प्रवासी अशाप्रकारे मृत्यू पावले आहेत, तर २००९ मध्ये ६२५ प्रवासी दगावले असून २०१० ला ५१९ आणि २००५ मध्ये ४९५ जणांचे प्राण गेले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 26, 2013 - 15:38
comments powered by Disqus