परपुरुषांसोबत हिंडल्यानं होतात बलात्कार - अबू आझमी

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, January 9, 2013 - 08:44

www.24taas.com, मुंबई
मुलींनी परपुरुषांसोबत फिरल्यानं आणि कमी कपडे घातल्यानं बलात्काराचं प्रमाण वाढल्याचा शोध समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी लावलाय.
बलात्कार का वाढलेत आणि स्त्रियांनी कसं वागायला हवं, हे सांगण्यासाठी नेते आणि संत म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये जणू काही स्पर्धा लागलीय, असं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मताशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचं सांगत आझमींनी ग्रामीण भागात बलात्कार होत नसल्याचं सांगितलंय.
यावेळी अबू आझमींनी महिलांनाही उपदेशाचे डोस पाजलेत. ‘स्त्रियांनी परपुरुषांसोबत बाहेर पडू नये. परपुरुषांसोबत फिरायला जायची तुम्हाला गरजचं का पडते? स्त्रियांच्या परपुरुषांसोबत फिरण्यावर बंदीच घालायची आवश्यकता आहे’ असं अबू आझमी यांनी म्हटलंय. कमी कपडे घातल्यानंही बलात्कारांच्या संख्येत वाढ होतेय, असं सांगताना आझमींनी मोहन भागवतांच्या वक्तव्याचंही समर्थन केलंय. बलात्कार भारतात नाही तर इंडियात होतात, असं भागवतांनी म्हटलं होतं.

‘भारतात महिलांना प्रमाणापेक्षा जास्तच स्वातंत्र्य दिलं गेलंय. हे स्वातंत्र्य शहरांत सर्रास दिसून येतं. त्यामुळेच शहरांत बलात्काराची संख्या जास्त आहे. भारतीय संस्कृती स्त्रियांना परपुरुषांसोबत फिरण्याची परवानगी देत नाही. रात्री उशीरापर्यंत महिलांनी बाहेर फिरण्यावरही बंदी घालायला हवी. जिथं पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी बलात्काराच्या घटनांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळेच राजस्थान आणि गुजरातमध्ये बलात्काराच्या खूप कमी तक्रारी दाखल होतात.
यानंतर अबू आझमी हिंदी सिनेमांवरदेखील घसरले. वाढत्या हिंसेला हिंदी सिनेमेच जबाबदार आहेत. हिंदी सिनेमांतून नग्नतेला प्रोत्साहन मिळतं असंदेखील आझमींनी म्हटलंय.

First Published: Wednesday, January 9, 2013 - 08:44
comments powered by Disqus