लाचखोरी पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यापर्यंत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंत्रालय परिसरात आणखी एक कारवाई करत गृहखात्याचा उपसचिव संजय खेडेकर याला रंगेहाथ अटक केली आहे.

Updated: May 19, 2016, 05:17 PM IST
लाचखोरी पोहोचली मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यापर्यंत title=

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंत्रालय परिसरात आणखी एक कारवाई करत गृहखात्याचा उपसचिव संजय खेडेकर याला रंगेहाथ अटक केली आहे. एका मुलाची पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाली होती. त्याची फाईल क्लिअर करण्यासाठी संजयनं मुलाच्या वडिलांकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. 

यातला 5 हजारांचा हप्ता घेताना संजयला अटक करण्यात आली. 10 दिवसांत मंत्रालय परिसरात ACBनं केलेली ही दुसरी कारवाई आहे. 9 तारखेला गजानन पाटील या व्यक्तीला लाच घेताना पकडण्यात आलंय. तो महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा स्वीय सचिव असल्याचं सांगत होता. दहा दिवसांच्या आत मंत्रालयाशी संबंधित लोकांवर acb कारवाई करत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खडसेंच्या कार्यालयातील माणसावर कारवाई झाल्यानंतर आज कुरघोडी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागातील उपसचिववर कारवाई झाली अशीही जोरदार चर्चा सुरु आहे. 

तर दुसरीकडे acb फक्त इतर मंत्र्यांच्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या विभागातही कारवाई करत आहे, निष्पक्ष कारवाई केली जात असल्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला जातोय अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.