कॅम्पाकोलावर पाच महिन्यांनी पडणार हातोडा

मुंबईत दिवसभर चर्चा होती ती कॅम्पाकोलाची. या कम्पाऊण्डमधल्या रहिवाशांचं काय होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. प्रचंड घालमेल सुरू असताना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. आणि पाच महिने कारवाईला स्थगिती दिली. दिवसभर हा आशा-निराशेचा खेळ सुरू होता. आणि त्याची सांगता झाली रहिवाशांनी केलेल्या जल्लोषानं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2013, 10:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत दिवसभर चर्चा होती ती कॅम्पाकोलाची. या कम्पाऊण्डमधल्या रहिवाशांचं काय होणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. प्रचंड घालमेल सुरू असताना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला. आणि पाच महिने कारवाईला स्थगिती दिली. दिवसभर हा आशा-निराशेचा खेळ सुरू होता. आणि त्याची सांगता झाली रहिवाशांनी केलेल्या जल्लोषानं.
घालमेल..... हुरहुर..... दुःख.... काळजी कॅम्पाकोलामधल्या प्रत्येक रहिवाशाच्या चेह-यावर दिसत होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कॅम्पाकोला कम्पाऊण्डमधल्या बिल्डिंगवरच्या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी दाखल झाले. तिक्रमणविरोधी पथकं येऊ लागली. महापालिकेच्या गाड्यांची संख्या वाढू लागली. तसतसे रहिवासी आणखी सुन्न झाले.
काहीजणांनी तर भीतीनं घर रिकामी करायला सुरुवातही केली. आता त्यांचा भरोसा होता तो फक्त देवावर आणि सुप्रीम कोर्टावर. सुप्रीम कोर्टात लढा सुरू होता, आणि दुसरीकडे होमहवन करत देवाचा धावा सुरू झाला. कारवाईला आलेल्या पालिकेच्या अधिका-यांना गुलाबाची फुलं देत गांधीगिरीचाही प्रयत्न रहिवाशांनी केला.
पालिकेच्या या कारावाईला विरोध करण्यासाठी पालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनारही उपस्थित होते. कारवाई थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. प्रसारमाध्यमांचा गराडा पडला होता. प्रचंड घालमेल वाढली. सगळ्यांचं लक्ष लागलं होतं सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे.

सुप्रीम कोर्टानं कॅम्पाकोलावरच्या कारवाईला पाच महिने स्थगिती दिली आणि रहिवाशांनी एकच जल्लोष केला. दुःख हलकं झालं.. फटाके फुटले, मिठाई वाटली.... पैसा पैसा जोडत घेतलेलं घर वाचणार याचा आनंद काय असतो, तो शब्दांत व्यक्त करणं शक्य नव्हतं, पण कॅमे-यात तो कैद झाला.

कॅम्पाकोलाच्या रहिवाशांचा हा विजय होता, पण अजून लढाई बाकी आहे. पाच महिने तरी त्यांची घरं उध्वस्त होणार नाहीत. पण हे पाच महिने रहिवाशांची घरासाठीची घरघर मात्र कायम राहणार आहे. कोर्टाने तसं बचावलेय. चार आठवड्यात रहिवाशांना घरे खाली करून दिली जातील, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. याच अटीवर पाच महिन्यांची स्थिगिती दिली आहे. त्यामुळे पाच महिन्यानंतर कॅम्पाकोलावर हातोडा पडणार असल्याचे स्पष्ट झाले.