'अजित पवार लाचखोर मंत्री'

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, April 19, 2013 - 16:47

www.24taas.com, मुंबई
'विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडचेरी सिंचन प्रकल्पात कंत्राटदारानं लाच देऊन आपली कामं करून घेतलीत... आणि या लाच खाणाऱ्यांमध्ये दुसरे तीसरे कुणीही नसून उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश आहे' असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय.
गोसीखूर्दचं काम करून घेण्यासाठी कंत्राटदारानं अनेक राजकीय नेत्यांसह सरकारी अधिकार्‍यांना लाच दिली... या व्यवहारात अजित पवारांना साडेसत्तावीस कोटी, नितीन गडकरींना ५० लाख, गोपीनाथ मुंडेंना २० लाख अशी लाच देण्यात आल्या आहेत, असंही पाटकर यांनी म्हटलंय.
गोसीखुर्द कालव्यातील एका भागाचं कॉन्ट्रॅक्ट महालक्ष्मी इन्फ्रास्टक्चर कंपनी लिमिटेडमधल्या एका संचालकाच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली होती. या धाडीत पैसेवाटपाबाबतचे काही कागदपत्र इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांच्या हाती लागले होते. हे कागदपत्र मेधा पाटकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवले असून या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हे आरोप केले आहेत.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनंही आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केलीय. अर्थखात्याच्या नियोजनशून्य कारभारावरही कॅगनं कडक ताशेरे ओढलेत. जलसंपदा खात्याच्या अनेक प्रकल्पांच्या अव्वाच्या सव्वा किमती वाढवल्याचं अहावालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळं अजित पवारांना लक्ष्य करण्याची संधी विरोधकांना पुन्हा एकदा मिळालीय.

First Published: Friday, April 19, 2013 - 11:51
comments powered by Disqus