बिल्डरच्या फायद्यासाठी ‘अमर महल’ ठरली धोकादायक!

बिल्डरच्या फायद्यासाठी चेंबूर येथील सुस्थितीतील ‘अमल महल’ बिल्डींग धोकादायक ठरवून तिचं वीज, पाणी बीएमसीनं तोडल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 2, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिल्डरच्या फायद्यासाठी चेंबूर येथील सुस्थितीतील ‘अमल महल’ बिल्डींग धोकादायक ठरवून तिचं वीज, पाणी बीएमसीनं तोडल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय. गेल्या पाच महिन्यांपासून या बिल्डींगमधील १८ कुटुंबं वीज आणि पाण्यावाचून राहत आहेत.
मयांक पद्माकर... मेणबत्तीच्या मिणमिणत्या मंद प्रकाशात उज्वल भविष्याचे धडे गिरवण्याचा प्रयत्न करतोय. पण, घामाघूम अवस्थेत आणि डासांच्या सानिध्यातच त्याला रात्र काढावी लागतेय. त्यामुळं मयांकला रात्रच होऊ नये असं वाटतं.

अशीचा गोष्ट वाकडे परिवाराची... ८६ वर्षीय महादेव वाकडे आणि त्यांची वृद्ध पत्नीही गेल्या पाच महिन्यांपासून वीज, पाण्यावाचून राहत आहेत. हे कमी होतं म्हणून की काय दोन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांनी आपला नातू गमवावा लागला. बीएमसी अधिकाऱ्यांना या वृद्ध दाम्पत्यांच्या डोळ्यातील ना अश्रू दिसले ना मयांकचे अंधारात सापडलेले भवितव्य...
चेंबूर पश्चिम इथल्या लॅण्डमार्क असलेल्या अमर महल बिल्डींगचे बीएमसीनं कुठलीही नोटीस न देता वीज, पाणी तर तोडलं आहेच शिवाय मलनिस्सारण वाहिनीही बंद करुन टाकलीय. कारण काय तर ही इमारत धोकादायक आहे. २००५ मध्ये इमारत आणि आजूबाजूची जागा बिल्डरनं विकत घेतल्यानंतर सुस्थितीतील इमारत धोकादायक ठरवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु झाल्याचा आरोप भाडेकरुंनी केलाय.
एकीकडं बिल्डर पर्यायी घर देण्यासाठीचा करार करण्यास तयार नाही तर दुसरीकडं मुंबई महापालिका बिल्डींग खाली करण्यासाठी अशा पद्धतीनं कारवाई करतंय. अशा दुहेरी कचाट्यात इथंलं रहिवासी सापडलेत. मुंबईत शेकडो धोकादायक इमारती आहेत जिथं लाखो मुंबईकर वास्तव्य करत आहेत. परंतु रहिवाशांची पर्यायी व्यवस्था न करता अमर महल बिल्डींगमधील रहिवाशांना रस्त्यावर आणण्याची एवढी घाई बीएमसी कुणाच्या फायद्यासाठी करत आहे? हे आता लपून राहिलेलं नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.