डॉक्टर विरुद्ध डॉक्टर; कोण जाणार सभागृहाबाहेर?

त्या दोघीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. दोघीही विद्यमान नगरसेविका आहेत. आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात त्या दोघीही सभागृह दणाणून सोडतात. अभ्यासू नगरसेविकांच्या यादीत दोघीही अव्वल आहेत. परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्या समोरासमोर ठाकल्या आहेत. म्हणूनच डॉक्टर विरूद्ध डॉक्टर ही लढत चुरशीची आणि वैशिष्टयपूर्ण अशीच आहे.

Updated: Feb 10, 2017, 01:42 PM IST
डॉक्टर विरुद्ध डॉक्टर; कोण जाणार सभागृहाबाहेर? title=

मुंबई : त्या दोघीही व्यवसायाने डॉक्टर आहेत. दोघीही विद्यमान नगरसेविका आहेत. आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात त्या दोघीही सभागृह दणाणून सोडतात. अभ्यासू नगरसेविकांच्या यादीत दोघीही अव्वल आहेत. परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्या समोरासमोर ठाकल्या आहेत. म्हणूनच डॉक्टर विरूद्ध डॉक्टर ही लढत चुरशीची आणि वैशिष्टयपूर्ण अशीच आहे.

कुर्ला पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १६८ मध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी उडवली असली तरी चर्चा आहे ती केवळ दोन महिला डॉक्टरांची... शिवसेनेतून लढतायत नगसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढतायत डॉ. सईदा खान... प्रभाग पुनर्रचनेने या दोघींना समोरासमोर आणलंय. 

शिवसेनेच्या डॉ अनुराधा पेडणेकर सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून चौथ्यांदा त्या निवडणूक लढवतायत. प्रभाग पुनर्रचनेत त्यांचा प्रभागाचे तीन तुकडे झाल्यानं त्या आता १६८ मधून नशीब आजमावतायत. केलेल्या कामाच्या जोरावर आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास त्या व्यक्त करतायत.

डॉ. पेडणेकर यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या डॉ. सईदा खानही अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांची ही दुसरी टर्म असली तरी गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची बहिण ही ओळख पुसून त्यांनी आपली वेगळी ओळख कामाच्या जोरावर निर्माण केली आहे. त्यामुळं काम बघून जनता आपली निवड करतील असा विश्वास त्यांना आहे.

याच परिसरात दोघींचेही क्लिनिक असल्यानं दोघींचाही जनसंपर्क चांगला आहे. परंतु मतदार कुठल्या डॉक्टरची निवड ट्रीटमेंटसाठी घेतायत, ते पाहणं महत्वाचं आहे. 

एकीकडं अभ्यासू नगरसेवकांची संख्या कमी होत असताना पालिका सभागृहात या दोघीही असणं गरजेचे आहे. परंतु निवडणुकीच्या या रणांगणातून एक डॉक्टर विजयी होईल तर एक डॉक्टर पराभूत...