बाळासाहेबांचं स्मारक `पार्क क्लब`च्या जागेवर...

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर दादारमधील पार्क क्लबच्या जागा निश्चित करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2013, 03:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर दादारमधील पार्क क्लबच्या जागा निश्चित करण्यात आलीय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी ही माहिती दिलीय.
पार्क क्लब महापौर निवासस्थानाच्या अगदी जवळच आहे. दादरमधला अतिशय जुना आणि प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या या क्लबची लीज संपलीय. याबाबत क्लबला नोटीसही बजावण्यात आलीय. या क्लबच्या लीजचं नुतनीकरण न करता तो ताब्यात घेऊन तिथं बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यात येणार आहे.

शिवसेनेचे आजवरचे अनेक मेळावे पाहिलेल्या शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कच्या मैदानातच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं, असा हेका शिवसेनेनं अगोदर घेतला होता. पण त्याला सरकारकडून भाव न मिळाल्यानं तसंच स्थानिकांनीही विरोध कडाडून विरोध केल्यानं शिवसेनेनं अखेर माघार घेतली. त्यानंतर महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर जागतिक `थीम पार्क`च्या स्वरुपात हे स्मारक उभारणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं. पण, सरकारने थीम पार्कची संकल्पनाच धुडकावून लावल्यानं सेनेला पुन्हा माघार घ्यावी लागली. त्यामुळे स्मारकासाठी अन्य एखादी जागा शोधणे शिवसेनेला भाग होते. अखेर, त्यासाठी पार्क क्लबची जागा निश्चित करण्यात आली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.