सावधान ! `भिशी` काढणाऱ्यांना आता कायद्याचा चाप

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, February 26, 2014 - 16:30

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही `भिशी` काढली आहे का? किंवा काढण्याची तयारी करत असाल तर सावधान. `भिशी` काढणाऱ्यांवर सावकारीविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे. याची माहिती विधानसभेत त्यांनी दिली.
अनेक ठिकाणी `भिसी` खुलेआम सुरु आहे. गावोगावी सुरू असलेली `भिशी` सावकारीविरोधी कायद्याच्या अंतर्गत येणार आहे. `भिशी` च्या माध्यमातून सावकारांचा पैसा मुरत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सावकारीविरोधी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आले. राज्याच्या मूळ कायद्यात राष्ट्रपतींनी काही महत्त्वाच्या दुरुस्ती सुचवल्याने जुने विधेयक मागे घेत राष्ट्रपतींच्या सूचनांसह नवीन विधेयक मांडण्यात आले. त्या वेळी पाटील यांनी ही माहिती दिली.
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केवळ सावकारांवर कारवाई करून प्रश्‍न सुटणार नसल्याचे यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणले. बचत गटांना आणि खासगी बॅंकांना सावकारी कायद्याचा फटका बसणार नाही. यासाठी त्यांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
`भिशी` सारख्या प्रकारात सावकार पैसे गुंतवतात. त्यामुळे, सामान्यांची फसवणूक होते. अशा प्रकारे कायद्यातून पळवाट शोधणाऱ्या बचत गट आणि `भिशी`चा आधार घेऊन कर्जपुरवठा करणारे खासगी सावकार यांच्यावरही कारवाई करण्याचा सरकारचा मानस आहे. या विधेयकावर सविस्तर चर्चा होणार असून त्यानंतरच ते मंजूर होईल. मात्र, हे विधेयक मंजूर करताना त्यामध्ये आमदारांनी सुचवलेल्या सुधारणांचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा असल्याचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 25, 2014 - 18:25
comments powered by Disqus