विरोधानंतर कॅम्पाकोलावरची कारवाई पालिकेने थांबविली

कॅम्पाकोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली खरी मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे अधिकाऱ्यांना नोटीस देऊन रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2014, 02:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली खरी मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे अधिकाऱ्यांना नोटीस देऊन रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कारवाईसाठी आलेल्या मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी झी मीडियाशी बोलताना दिली. रहिवाशांनी कॅम्पाकोला परिसरात होम हवन केले. त्यानंतर सर्वच रहिवासी गेटसमोर एकवटले होते. पालिका अधिकारी येताच त्यांना गेटवर रोखून धरत कारवाई करण्यास मज्जाव केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी गेटवर रहिवाशी हात जोडून पालिका अधिकाऱ्यांना गयावया करीत होते.
सकाळी कॅम्पा कोला परिसरात पोलिसांनी बँरिकेडस लावली होती. आज फक्त गॅस आणि वीज तोडली जाणार होती. परंतु पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाही. विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाईल, असे स्पष्ट केलं. त्यामुळे रहिवाशांचा विरोध पाहता पालिका अधिकारी माघारी फिरलेत.
दरम्यान, नवनिर्वाचित शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कॅम्पाकोलावासीयांना पाठिंबा दर्शवला. तेही या ठिकाणी उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवर आशिष चेंबूरकर, भाजप नेत्या शायना एन. सी ही उपस्थित होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.