'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

Updated: Jun 17, 2015, 07:54 PM IST
'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी title=

मुंबई : छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. छगन भुजबळ आणि कुटुंबियांच्या १७ मालमत्तांवर एसीबीनं मंगळवारी छापे घातले होते. भुजबळ कुटुंबियांशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रं एमईटीमध्ये असण्याची शक्यता होती. त्यानुसार आजचा छापा घालण्यात आला. मात्र एमईटीच्या झडतीमध्ये गुन्ह्याच्या पुराव्याच्या दृष्टीनं उपयुक्त कागदपत्रे किंवा इतर आक्षेपार्ह वस्तू व कागदपत्रे सापडली नाहीत, अशी माहिती एसीबीनंच दिलीय.

दरम्यान, भुजबळांवर आयकर विभागही कारवाई करणार असल्याचं भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केलाय.

माजी मंत्री छगन भुजबळ हे सध्या राष्ट्रवादीमध्ये एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय. एसीबीनं भुजबळांच्या घरांवर तसंच कार्यालयांवर काल धाडी घातल्या. त्यानंतरही राष्ट्रवादीचे बडे नेते गप्प बसून आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा अपवाद वगळता अन्य सर्व नेत्यांनीही तोंडावर बोट ठेवणं पसंत केलंय. सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत व्यस्त असलेल्या शरद पवारांनीही भुजबळ प्रकरणावर मौनच बाळगलंय. भुजबळांची पाठराखण करण्यासाठी राष्ट्रवादीचा एकही बडा नेता पुढं आलेला नाही. त्यामुळं भुजबळांची अवस्था एकटं पडल्यासारखी झालीय. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अबोल्याचा नेमका अर्थ काय, असा सवाल आता केला जातोय.

मात्र, नाशकातले त्यांचे समर्थक मात्र एकदम आक्रमक झालेत. राष्ट्रवादीच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मुबंई-आग्रा महामार्गावर आंदोलन केलं. यावेळी समर्थकांनी एक बसही फोड़ली. याप्रकरणी भुजबळ समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.