मुंबईत चहावाल्याने सहा बॅंका लुटल्या

वय वर्षे ३३. मुंबईतील एक चहावाला करोडपती. मात्र, याच करोडपती चहावाल्याने मुंबईतील चक्क सहा बॅंका फोडल्या आणि मालामाल झाला. या चहावाल्याला पोलिसांनी ओडिशातून ताब्यात घेतले.

Updated: Sep 11, 2014, 09:11 AM IST
मुंबईत चहावाल्याने सहा बॅंका लुटल्या title=

मुंबई : वय वर्षे ३३. मुंबईतील एक चहावाला करोडपती. मात्र, याच करोडपती चहावाल्याने मुंबईतील चक्क सहा बॅंका फोडल्या आणि मालामाल झाला. या चहावाल्याला पोलिसांनी ओडिशातून ताब्यात घेतले.

घाटकोपर येथील कॅनरा बॅंकेत ऑगस्टमध्ये चोरी झाली होती. ५५ लाखांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी या बॅंकेतील एक अधिकारी महिला आणि बॅंकेत चहा विकणाऱ्या तरुणासह चार जणांना अटक केली आहे. चहा विक्रेत्या तरुणाने अन्य काही बॅंकांतही चोरी केल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे. 

या चहावाल्याचे नाव ऋषिकेश वारीक असे आहे. घाटकोपर परिसरात कॅनरा बॅंक आहे. या परिसरात बनावट चाव्या बनवणाऱ्यांची माहितीही मिळवण्यात आली. त्या आधारे पोलिसांनी युसूफ खान आणि इम्रान खान यांना अटक केली. त्यांनी ऋषिकेशविषयी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ऋषिकेश याला अटक करून 30 बनावट चाव्या, 11 एटीएम कार्डे आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले. न्यायालयाने ऋषिकेशला शुक्रवारपर्यंत  पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

चोरीसाठी अशी युक्ती

 एखाद्या बॅंकेत चोरी करायची असल्यास तिथे चहावाला म्हणून येत असे. अधिकाऱ्यांचा विश्‍वास संपादन करून किंवा त्यांना काही प्रलोभन दाखवून तो चाव्यांबाबत माहिती मिळवत असे. सुटीच्या दिवशी किंवा बॅंक बंद झाल्यावर बनावट चावीने तो शटर उघडून आत घुसत असे. बॅंकेतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची माहिती असल्याने तो रात्री रेनकोट घालून, छत्री उघडून तसेच डोक्‍यात हेल्मेट आणि  हातमोजे घालून बॅंकेत चोरी करीत असे. 

कॅनरा बॅंकेत चोरी करण्यापूर्वी त्याने तेथील एका  भावना नावाच्या महिलेला हाताशी धरले होते. तिने आर्थिक आमिषापोटील त्याला माहिती दिली. पोलिसांनी या महिलेलाही अटक केली आहे.  देना बॅंक शिवाजी पार्क, देना बॅंक गोवंडी शाखा, एक्सलेंट को-ऑप.  बॅंक मरोळ या ठिकाणी त्याने चोरी केल्याचे कबुल केलेय.

ऋषिकेशने 19 नातेवाइकांच्या बॅंकेतील खात्यांवर 40 लाख 34 हजार रुपये ठेवले होते. ओरिसा येथील एका बॅंकेतील त्याच्या खात्यात साडेआठ लाख होते. आतापर्यंत त्याने 84 लाख 5 हजारांची रक्कम बॅंकांतून चोरली होती. त्याने ओरिसात 15 ठिकाणी जमिनी विकत घेतल्या असून, भुवनेश्‍वर येथे दोन सदनिकाही बुक केल्या होत्या. त्याने जवळपास १ कोटी १९ लाख ९७ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचे  पोलिसांकडून सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.