भुजबळांची तब्बल १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त!

अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) माजी बांधकाम विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जोरदार झटका दिलाय.

Updated: Nov 14, 2015, 11:54 PM IST
भुजबळांची तब्बल १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त! title=

नवी मुंबई : अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) माजी बांधकाम विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जोरदार झटका दिलाय.

भुजबळ यांचे चिरंजीव आणि पुतणे संचालक असलेल्या 'देविशा कन्स्ट्रक्शन'ची नवी मुंबईतील १६० कोटींची जमीन ईडीनं जप्त केलीय. नवी मुंबईच्या खारघर भागातील या जमीनीचा हक्क भुजबळ कुटुंबीयांकडे आहे. 

भुजबळांच्या या कंपनीनं खारघर भागात 'हेक्स वर्ल्ड' नावाची शानदार इमारत बनवण्याचं स्वप्न दाखवलं होतं. जवळपास २३०० लोकांनी या इमारतीत घर बुक केलं होतं. घर बुक करणारांकडून ४४ करोड रुपये घेण्यात आले होते. त्यानंतर मात्र एकानंतर एक अशा वादांत अडकलेलं हे प्रोजेक्ट कधी पूर्ण झालंच नाही. त्यानंतर घर बुक करणाऱ्या लोकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 

याच वर्षी १७ सप्टेंबर रोजी ईडीनं 'फेमा' कायद्यांतर्गात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर नोंदवली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत ईडीनं ही कारवाई केलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, काही महिन्यांपूर्णी छगन भुजबळ यांच्या १६ ठिकाणांवर छापे मारत अॅन्टी करप्शन ब्युरोनं भुजबळांची अरबोंची संपत्ती जप्त केली होती. 

दरम्यान, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा अनेक बोगस कंपन्या तसंच बँक खाती बनवली असून सगळ्यांना जेलची हवा खावी लागणार, अशी तिखट प्रतिक्रिया यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिलीय.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.