पराभव दिल्लीत, गोंधळ गल्लीत

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर लगेच उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने हतबल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निकालामुळे काहीसा दिलासा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. 

Updated: Feb 10, 2015, 08:16 PM IST
पराभव दिल्लीत, गोंधळ गल्लीत title=

दीपक भातुसे, मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर लगेच उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवाने हतबल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या निकालामुळे काहीसा दिलासा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. तर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपाच्या दादागिरीविरोधात आवाज उठवण्याचे बळ मिळालं आहे. राज्यातील भाजपालाही आता दिल्लीच्या पराभवानंतर चिंतन करण्याची गरज वाटू लागली आहे. तर मनसेसाठीही हा निकाल प्रेरणादायी ठरू शकतो.

 
दिल्लीतील निवडणुकीचे राज्याच्या राजकारणात पडसाद निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेला नवी ऊर्जा केजरीवालांचा विजय राज ठाकरेंनाही प्रेरणादायी ठरू शकेल.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाचा वारू चौफर उधळत होता. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही या वारूने सगळ्यांना साफ करून टाकले. मात्र महाराष्ट्रात भाजपाला 123 जागा जिंकता आल्या, मात्र पूर्ण बहुमत मिळालं नाही. असं असलं तरी भाजपाच्या नेत्यांचं वागणं, बोलणं या निकालाने बदलून टाकलं.

भाजपाला इतर सर्व पक्ष तुच्छ वाटू लागले. अगदी शिवसेनेला सत्तेत बरोबर घेऊनही भाजपाकडून त्यांना खालच्या दर्जाची वागणूक दिली जाऊ लागली. सत्ते पुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात, त्यामुळे राज्यातील भाजपाच्या सत्तेपुढेही कुणाचं शहाणपण चालत नव्हतं.

मात्र आता दिल्लीतील निकालामुळे भाजपाच्या नेत्यांचे पाय जमीनीवर येतील अशी शक्यता आहे. आमच्या नेत्यांनी आता जमीनीवर यावं असं भाजपाचे राज्यातील आमदारही खाजगीत बोलू लागले आहेत. त्यामुळे दिल्ली निकालानंतर आता राज्यातील भाजपालाही चिंतन करण्याची गरज वाटू लागली आहे.

दिल्लीच्या निकालामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा मिळाली आहे. भाजपाची देशभर असलेली लाट ओसरू शकत नाही, त्यामुळे आपला पक्ष पुन्हा कसा उभा राहणार अशी चिंता या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना होती. काँग्रेसने राज्यात पुन्हा आपले स्थान बळकट करण्यासाठी सरकारविरोधात आंदेलनाची हाक दिली आहे. आता त्यांच्या या आंदोलनाला दिल्लीतील निकालामुळे अधिक ऊर्जा मिळणार आहे. दुसरीकडे संधी मिळेल तिथे भाजपाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आता भाजपाविरोधात आक्रमक होऊन राज्यात आपले स्थान बळकट करण्याची तयारी करेल.

राज्यात भाजपाबरोबर शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे. मात्र शिवसेना सत्तेत आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. कारण भाजपाने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतलं असलं तरी सत्ता राबवण्याची संधी मात्र दिलेली नाही. जिथे संधी मिळेल तिथे शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून भाजपाने केला. त्यामुळेच की काय दिल्लीतील निकालानंतर उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांचे तात्काळ अभिनंदन केले. या निकालामुळे आता भाजपाविरोधात आक्रमक होण्याची ऊर्जा शिवसेनेला प्राप्त झाली आहे, असं म्हणावं लागेल.
 
अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचा लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाला होता. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचा आणि काँग्रेसचा धुव्वा उडवला. एकप्रकारे फिनिक्स पक्षाप्रमाणे आपने मारलेली ही भरारी सध्या आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असणाऱ्या मनसेसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.

देशासह महाराष्ट्रातही भाजपा लाटेमुळे सगळेच पक्ष हवालदिल झाले होते. भाजपाची वाढती लोकप्रियता आणि देशभरातील एक एक राज्य काबिज करत उधळलेला भाजपाचा वारू कुणी रोखू शकणार नाही, असं सगळ्याचं पक्षांना काही दिवसापूर्वीपर्यंत वाटत होतं. मात्र दिल्ली निकालाने सगळ्यांचे अंदाज चुकवले आणि दिल्लीचा हा निकाल सर्वच पक्षांना नव्याने उभे राहण्याची बळ देणारा ठरला आहे. दुसरीकडे हवेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना जमीनीवर आणण्याचं कामही या निकालाने केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.