महाेत्सव विधानसभा निवडणुकांचा

अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झालाय. सण साजरे करतानाच राज्याला वेध लागलेत ते लोकशाहीच्या उत्सवाचे, अर्थात निवडणुकांचे. संस्कृती जपणारे आपले सण आणि लोकशाही घडवणारा निवडणुकांचा उत्सव. यांची एक वेगळी सांगड. मतदारराजासाठी. 

Updated: Sep 18, 2014, 04:49 PM IST
 महाेत्सव विधानसभा निवडणुकांचा

मुंबई : अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झालाय. सण साजरे करतानाच राज्याला वेध लागलेत ते लोकशाहीच्या उत्सवाचे, अर्थात निवडणुकांचे. संस्कृती जपणारे आपले सण आणि लोकशाही घडवणारा निवडणुकांचा उत्सव. यांची एक वेगळी सांगड. मतदारराजासाठी.

अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या रंगात रंगलाय. गणेशोत्सवापाठोपाठ सगळे सण रांगेत उभेच आहेत. गणपती, नवरात्र, दसरा, बकरी ईद, दिवाळी आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात लोकशाहीच्या महाउत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 

अर्थात हा महाउत्सव आहे विधानसभा निवडणुकांचा. भारत हा जगभरात कदाचित एकमेव देश असावा, जिथं निवडणूक एखाद्या सणासारखी साजरी होते. आता कॅलेंडरच्या आकडेवारीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राची नवी विधानसभा ९ नोव्हेंबरपूर्वी अस्तित्वात येणं आवश्यक आहे. म्हणजे साधारण पुढच्या ६५ दिवसांत नव्या सरकारचा राज्याभिषेक व्हायला हवा. मात्र या ६५ दिवसांपैकी बहुतेक दिवस सण साजरे करण्यातच जाणार आहेत. 

गणपतीचे दहा दिवस, त्यापाठोपाठ २५ सप्टेंबरपासून नवरात्रातले नऊ दिवस, त्यापाठोपाठ ३ ऑक्टोबरचा दसरा, मग पाच किंवा सहा ऑक्टोबरला बकरी ईद आणि दिवाळीचे पाच दिवस. त्यासोबत २ ऑक्टोबरची गांधी जयंतीची सुट्टी. एकूण निवडणुकीच्या डेडलाईनचा हिशोब करता ६५ दिवसांतले २५ दिवस सण साजरे करण्यात खर्च होणार आहेत. म्हणजे निवडणुकीच्या प्रचारासाठी उरले काठावर पास होण्याइतके अवघे ३५ दिवस.  मात्र अजूनही निवडणुकांची घोषणा झालेली नाही.

साधारणपणे निवडणूक ३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान होईल, असं गृहीत धरलं, तर आता जेमतेम महिना राहिलाय. त्यामुळे आता पुढच्या काळात सणांच्या बाजारातच राजकीय पक्षांना आपापलं मार्केटिंग करावं लागणार आहे. त्याचा 'श्रीगणेशा' गणेशोत्सवातच झालाय. गणपती उत्सवादरम्यान खड्डे खोदलेल्या मंडळांकडून दंड वसुलीबाबत महापालिकेची नरमाईची भूमिका. हे पहिलं उदाहरण. नवरात्रात ठिकठिकाणी राजकीय पक्षाच्या तालावर गरबे रंगतील. विजयादशमीच्या दिवशी विजयाच्या निर्धाराचा दसरा मेळावा होईल. त्याआधी गांधी जयंतीच्या दिवशी सगळेच पक्ष गांधी आपल्यालाच कसे कळले आणि आपल्याच कसे जास्त जवळचे होते, ते दाखवण्यासाठी गांधीगिरी आणि बॅनरबाजी करतीलच.

बकरी ईदच्या शुभेच्छांचीही स्पर्धा रंगेल. झालंच तर कोजागिरीला बदाम पिस्ते घातलेलं मसाला दूध देऊन मतदारांना मस्के लावण्यात येतील. हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे या सणांच्या आडूनच लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांची तयारी होणार आहे.

मतदाराला भुलवण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले जातील. म्हणूनच मतदार राजा सणांच्या काळात जागा राहा. फुलणारी 'कमळं'ही असतील आणि सुटणारे 'बाण'ही असतील. पण 'घड्याळा'बरोबर अचूक वेळ साधत तुमचा 'हात' कुणाबरोबर द्यायचा हे तुम्ही नीट ठरवा, त्यावरच राज्याचं 'इंजिन' कुठे जाणार, ते अवलंबून राहणार आहे. २१ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या पावलांनी दिवाळी येतेय. पण ती दिवाळी धनधान्यांच्या राशी घेऊन कुणाच्या घरी येणार आणि कुणाचा शिमगा करणार. ते काळाची पावलंच ठरवणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.