देवेंद्र फडणवीस सरकार गिरवणार मोदींचाच कित्ता

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर मंत्री कार्यालयातील सगळा जुना स्टाफ बदलला होता. मंत्रालयातील स्टाफची नियुक्ती करताना देवेंद्र फडणवीस सरकार मोदींचाच कित्ता गिरवणार असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी जुन्या मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक सध्या नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग करताना दिसत आहे.

Updated: Nov 5, 2014, 10:06 AM IST
देवेंद्र फडणवीस सरकार गिरवणार मोदींचाच कित्ता title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यानंतर मंत्री कार्यालयातील सगळा जुना स्टाफ बदलला होता. मंत्रालयातील स्टाफची नियुक्ती करताना देवेंद्र फडणवीस सरकार मोदींचाच कित्ता गिरवणार असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी जुन्या मंत्र्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सहाय्यक सध्या नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग करताना दिसत आहे.

राज्यात मागील १५ वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांकडे मागील १०  ते १५ वर्षांपासून तेच सचिव, खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी ठाण मांडून बसलेत. मात्र आता सरकार बदललंय... त्यामुळं हा स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधान कार्यालयातील स्टाफ आणि मंत्री कार्यालयातील सर्व स्टाफ बदलला होता.

जुन्या मंत्र्यांकडील एकही अधिकारी नियुक्त करू नये अशा स्पष्ट सूचनाच मोदी यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या होत्या. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी सरकारचा हा कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर प्रविण दराडे यांची नियुक्ती करून देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. फडणवीस सरकार अत्यंत काटेकोरपणे नव्या नियुक्त्या करणार आहे. या नियुक्त्यांसाठी काही निकष लावण्यात येणार आहेत.

यात प्रामुख्याने क्लीन सर्व्हिस रेकॉर्ड, विकासाची दृष्टी, कष्ट करण्याची तयारी, प्रशासकीय गुप्तता पाळणारा अधिकारी यांचा समावेश असेल. असं असलं तरी आघाडीच्या मंत्र्यांकडे असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी नव्या मंत्र्यांकडे वर्णी लागावी, यासाठी लॉबिंग सुरू केलंय.

 हे लॉबिंग किती यशस्वी होईल याबाबत शंका आहे. मंत्री स्टाफबरोबरच खात्यांच्या सचिवपदासाठीही सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यामुळंच येत्या काही दिवसात प्रशासनात मोठे फेरबदल होणार, हे निश्चित आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.