देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सोमवारी रात्री फडणविसांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. गडकरी-राज ठाकरेंच्या भेटीच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्याची चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2014, 12:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सोमवारी रात्री फडणविसांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. गडकरी-राज ठाकरेंच्या भेटीच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्याची चर्चा आहे.
मनसेला महायुतीत घेण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना शिवसेना कसा प्रतिसाद देतेय याकडं आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मनसेनं निवडणूक लढवू नये, असा सल्ला भाजपचे नेते नितीन गडकरींनी दिला होता. त्याचबरोबर मनसेला महायुतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हंटलंय. त्याआधी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची मुंबईतल्या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये भेट झाली. त्यानंतरच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही नव्या समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. ही भेट झाल्याचं राज ठाकरे यांनी मान्य केलं होतं. पण तपशील सांगायला नकार दिला.
मात्र गडकरींच्या या नव्या स्पष्टीकरणानंतर हे सगळं स्क्रिप्टेड होतं का, याची चर्चा सुरू झालीय. नितीन गडकरी आणि राज ठाकरेंनी अशी उघडपणे भेट का घेतली, या थेट भेटीमागे नेमकी काय खेळी आहे असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची संतुलित भूमिकेचे नेते म्हणून भाजपमध्ये ख्याती आहे. मात्र तेदेखील या भेटीत का सहभागी झाले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईत भाजप लोकसभेच्या तीन जागा लढवत आहे. या तीनही मतदारसंघांत शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपला विजय मिळवणं अवघड असल्याची जाणीव असूनही गडकरींनी नेमकी ही भेट घेऊन उद्धव ठाकरेंचा रोष का ओढवून घेतला याचंही कोडं सर्वांना पडलंय. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन उद्धव यांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.