लवकरच सुरू होणार `ईस्टर्न फ्री वे`

मुंबईकरांचा प्रवास जलद करणारा ‘इस्टर्न फ्री वे’ जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 1, 2013, 05:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांचा प्रवास जलद करणारा ‘इस्टर्न फ्री वे’ जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला होतोय. उपनगरांमधून सीएसटीला अवघ्या २० मिनिटांत घेऊन येणारा हा मार्ग मुंबईतली ट्रॅफिक जॅमची समस्या सोडवू शकेल. ‘इस्टर्न फ्री वे’ अर्थात पश्चिम मुक्त मार्गाचा वापर करून उपनगरांमधून अवघ्या २० मिनिटांत मुंबईत येता येणार आहे. म्हणजेच, फास्ट लोकलपेक्षाही कमी वेळेत घाटकोपर ते सीएसटी हे अंतर पार करता येईल.
‘इस्टर्न फ्री वे’ची वैशिष्ट्यं...
> सीएसटी ते पांजरपोळ, शिवाजी चौक हा १४ किलोमीटरचा पहिला टप्पा आहे.
> पांजरपोळ ते घाटकोपर हा तीन किलोमीटरचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये खुला झाल्यानंतर हा फ्री वे खऱ्या अर्थानं पूर्ण होईल.
> आनंदाची गोष्ट म्हणजे या फ्रीवेवर टोल नसेल, एकही सिग्नल नसेल. त्यामुळे उपनगरांमधून शहरामध्ये अवघ्या २० मिनिटांत येता येईल
> फ्रीवेवर येण्यासाठी किंवा हा फ्री वे सोडण्यासाठी एकूण नऊ ठिकाणी एन्ट्री आणि एक्झिट रॅम्प देण्यात आलेत.
पहिला रॅम्प अर्थातच ऑरेंज गेटपाशी पी-डिमेलो रोड आणि पोर्ट रोडच्या जंक्शनजवळ असेल. कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट आणि दक्षिण मुंबईतल्या अन्य भागांतून फ्रीवेवर एन्ट्री-एक्झिटसाठी हे रॅम्प असतील.
> पोर्ट रोडला बाहेर पडण्यासाठी आणखी एक डाऊन रॅम्प थोडा पुढे देण्यात आलाय. शिवडी, वडाळा, माटुंगा, दादरला जाणाऱ्या वाहनांना इथून बाहेर पडता येईल.
> तिसरा एन्ट्री रॅम्प रे रोडवरून असेल. लालबाग, परळ, जेकब सर्कल, करीरोड इथून वाहनांना फ्रीवेवर जाता येईल.
पोर्ट रोडला एन्ट्री-एक्झिट रॅम्पची एक जोडी असेल. वडाळा, दादर, माहीम, माटुंगा इथल्या वाहनांना याचा उपयोग होईल. हे रॅम्प डिसेंबरमध्ये खुले होत आहेत.
> डिसेंबरमध्येच भक्ती पार्कजवळचे रॅम्प खुले होतील. सायन, धारावी, कुर्ला, चेंबूर, वांद्रे इथल्या वाहनांना एन्ट्री-एक्झिटसाठी याचा वापर होईल.

> आरसीएफ मार्गावर आणि त्याच्या आधी एन्ट्री-एक्झिटसाठी चार रॅम्प देण्यात आलेत. चेंबूर, आरसीएफ, कुर्ला आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून वाहनांना फ्रीवेचा वापर या रॅम्पद्वारे करता येईल.
> पहिल्या टप्प्यातले शेवटचे रॅम्प अर्थात शिवाजी चौक, पांजरपोळ इथं असतील. आर.के. स्टुडिओजवळ माहुल मार्गावर या रॅम्पद्वारे फ्रीवे सोडता येईल किंवा रस्त्यावर प्रवेश घेता येईल.
> दुसऱ्या टप्प्यात डिसेंबरमध्ये खुल्या होणा-या मार्गावर गोवंडी ROB जंक्शनला एन्ट्री-एक्झिट रॅम्प असतील. लोखंडे रोड, देवनार इथल्या वाहनांना या रॅम्पद्वारे फ्री वे वापरता येईल.
> फ्रीवेवरची शेवटचे एन्ट्री-एक्झिट रॅम्प घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर असतील. ठाणे, नाशिक, विक्रोळी, ऐरोली इथल्या वाहनांसाठी इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचे हे रॅम्प वापरता येतील. तसंच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहनांनाही याद्वारे फ्रीवे वापरता येईल.
> फ्रीवेचा पहिला टप्पा संपत असताना एक बोगदाही आहे. एखाद्या महानगरात असलेल्या रस्त्यावर असणारा देशातला हा पहिलाच बोगदा आहे.
> केवळ कार, एसयूव्ही आणि बसना या फ्रीवेवर जाण्याची परवानगी असेल.

> टू व्हिलर, ऑटोरिक्षा तसंच मल्टी ऍक्सल मालट्रक यांना फ्रीवेवरून जाता येणार नाही.

> फ्रीवेवर जास्तीत जास्त वेगमर्यादा ६० किलोमीटर आखून देण्यात आलीय.
> एमएमआरडीएच्या अंदाजानुसार दररोज ३५ हजार वाहनं प्रवास करतील.
या फ्रीवेमुळे मुंबईची वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्याच्या दिशेनं पडलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.