एक्सक्लुझिव्ह : आपल्या वडिलांसाठी शीनानं लिहिलेलं पत्रं!

शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात तिची आई इंद्राणी मुखर्जी, सावत्र वडील संजीव खन्ना आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. याच दरम्यान, मृत शीनानं स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली डायरी समोर आलीय. ही डायरी 'डीएनए' या वृत्तसमूहानं उघड केलीय. 

Updated: Sep 3, 2015, 09:56 AM IST
एक्सक्लुझिव्ह : आपल्या वडिलांसाठी शीनानं लिहिलेलं पत्रं! title=

मुंबई : शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात तिची आई इंद्राणी मुखर्जी, सावत्र वडील संजीव खन्ना आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. याच दरम्यान, मृत शीनानं स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली डायरी समोर आलीय. ही डायरी 'डीएनए' या वृत्तसमूहानं उघड केलीय.  

आपल्यालाही इतरांप्रमाणे समाजानं स्वीकारावं, आपलीही कुणी काळजी करणारं असावं, आपल्यालाही प्रेम मिळावं यासाठी वयात येणारी शीना झगडत होती. गुवाहाटीत आजी-आजोबांकडे वाढणाऱ्या शीनानं आपल्या डायरीत पहिल्यांदा इंद्राणीबद्दल प्रेम व्यक्त केलं होतं... पण, जसजशी ती मोठी होत गेली तसंतसं ती इंद्राणीचा तिरस्कार करू लागल्याचं या डायरीतून पुढे येतंय. 

अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत... 

आपल्या या डायरीत शीनानं आपल्या मित्रांबद्दल, काही फोन नंबर आणि आपल्या वडिलांनाही काही पत्रं लिहिलित. सिद्धार्थ दास यानं मीडियासमोर केलेल्या वक्तव्यांशी अगदी विरुद्ध शीनाच्या काही नोंदी सांगतायत. शीना आपल्या वडिलांच्या सतत संपर्कात होती असं तिच्या डायरीतून समोर येतंय. या डायरीत लिहिलेली पत्र शीना नंतर पोस्ट करीत असावी, असं दिसतंय.

डॅडी, सॉरी मी तुम्हाला पत्र लिहू शकले नाही!
'डॅडी, मी तुमच्यावर खूप रागावलेय. ओके... पण, मला तुम्हाला पत्र लिहायला वेळच मिळत नाही पण तुम्ही तरी मला पत्र पाठवायला हवं ना... व्हेरी मीन हा! वेल, सॉरी मी तुम्हाला एकही पत्र न लिहिल्याबद्दल... दहावीला आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागतेय. सकाळी ७.३० वाजता आम्हाला शाळेत जावं लागतं.... आणि पुन्हा दुपारी ३ ते ४.३० पर्यंत गणिताचा क्लास असतो... त्यानंतर ६ ते ८ वाजेपर्यंत विज्ञानाचा क्लास असतो. मला घरी पोहचेपर्यंत ८.३० वाजलेले असतात. कदाचित मी किती मेहनत घेतेय याचा तुम्हाला अंदाज येत असेल' असं तिनं आपल्या एका नोंदीमध्ये म्हटलंय. 

डॅडी, एकदा मला भेटायला या!
एखाद्या मुलाला आपल्या वडिलांकडून असणाऱ्या अपेक्षा शीनालाही होत्याच... पण, तिच्या या साध्या अपेक्षाही पूर्ण झाल्या नाहीत. दहावीमध्ये असताना शीनानं आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रांतून हेच दिसतंय. एका नोंदीत तिनं लिहिलंय 'डॅडी, मी माझी नखं कापलीत, मी नखं वाढवणार नाही. मी तुम्ही दिलेला सल्ला मानतेय -  अगोदर अभ्यास आणि नंतर स्टाईल... मला माहितेय, तुमच्याकडे मला सांगण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. पण डॅडी मला या गोष्टी पत्रांतून सांगू नका... माझ्या HSLC च्या परिक्षेपूर्वी तुम्ही एकदा याल, अशी आशा आहे. डिसेंबरमध्ये तुम्ही गुवाहाटीला एखादी फेरी का मारत नाही. मग, मला ज्या गोष्टी मला माहीत असाव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वत: मला सांगाल'
 
डॅडी, माझी 'जात' (cast) कोणती आहे?
आपल्या एका पत्रात शीनानं सिद्धार्थला माझी 'जात' कोणती आहे? असाही प्रश्न विचारलाय. 'डॅडी, मला एक प्रश्न पडलाय. माझ्या HLSC परीक्षेसाठी मला काही अर्ज भरायचेत आणि त्यात आम्हाला आमची 'जात' कोणती असा प्रश्न विचारलाय. डॅडी मी खरंच खूप गोंधळलेय कारण, मला माझी जात कोणती याबद्दल खात्री नाही. आम्हाला ऑप्शन दिले गेलेत... अनुसूचित/ओबीसी/.... ' असं शीनानं आपल्या डायरीत म्हटलंय. 

बोर्डाच्या परीक्षेअगोदर शाळेत झालेल्या परीक्षेबद्दलही शीनानं आपल्या वडिलांना कळवलंय. परीक्षेदरम्यान मी खूप आजारी होते... खूप अभ्यास करू शकले नाही. मला ८४% मार्क्स मिळालेत, असंही तिनं म्हटलंय. 

'खूप खर्च असतो...'
शीनानं आपल्या वडिलांकडे सर्टिफिकेट मागितलं होतं... 'हे सर्टिफिकेट मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे...'  पुढे खूप खर्च आहेत... आणि तुम्ही आमच्या भविष्यासाठी हे करा, अशीही विनवणी शीनानं तिच्या वडिलांकडे केलीय. २८, २९, ३० मार्च अशी तारीख या नोंदीवर आहे. 

मामांशी जास्त संबंध ठेऊ नका!
एका पत्रात शीनानं आपल्या वडिलांना आपल्या मामांसोबत मिळून नवीन उद्योग न सुरू करण्याचा सल्लाही दिला होता. कारण, एक मामा नोकरी शोधतोय, त्याला संधी मिळाली तर लगेचच तो तिकडे उडी मारेन असंही शीनानं म्हटलंय. 'दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वत:च्या हिंमतीवर काही सुरू करू शकत नाहीत का?' असाही उद्विगतेनं प्रश्न लहानग्या शीनानं आपल्या वडिलांना या पत्रातून विचारला होता. 'HITACHI KK'ची नोकरी सोडून दुसरी एखादी चांगली नोकरी शोधण्यासही तिनं सिद्धार्थला सांगितलं होतं. पण, नंतर 'ओह, इथे मी तुम्हाला शिकवतेय, असं वाटतंय' असंही तिनं म्हटलंय.

'आजी-आजोबांना तुम्ही आवडत नाही'
आपल्या आजी-आजोबांबद्दलही तिनं आपल्या डायरीत उल्लेख केलाय. ती सिद्दार्थला सांगतेय की, 'मला तुमच्याशी बोलायचंय... पण, मी तुम्हाला फोन करू शकत नाही. आजी-आजोबा म्हणतात तुम्ही चांगल नाहीत. तुम्ही त्यांना आवडत नाही. पण, माझं मन मला त्यांच्यावर विश्वास ठेवायला परवानगी देत नाहीए' 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.