'ते' सामूहिक बलात्कारी ५ नाही, तर ८!

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, September 3, 2013 - 21:08

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. शक्तीमिल कम्पाऊंड गँगरेप प्रकरणातील अटकेत असलेल्या पाच आरोपींसह आणखी तिघे जण या टोळीत असल्याचं आता समोर येतंय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जणांची ही गँग आहे. या टोळीनं आजवर अशी ९ घृणास्पद कृत्य केलीयेत. यात ५ बलात्काराच्या घटना आहेत. आज आणखी एक मुलगी तक्रार करण्यासाठी पुढे आल्यानंतर हा खुलासा झालाय.
तिच्या तक्रारीनंतर आणखी एक आरोपी संतोष उर्फ गोट्या याला अटक झालीये. तर अशफाक आणि त्याचा आणखी एक साथीदार फरार आहेत...
मुंबईत शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलंय. ३१ जुलैच्या रात्री फोटो जर्नलिस्ट सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींनी आणखी एका मुलीवर बलात्कार केला होता. ती मुलगी तब्बल एका महिन्यानंतर समोर आलीय.
फोटो जर्नलिस्ट गँगरेप प्रकरणातल्या आरोपींनी आणखी दोन मुलींवर गँगरेप केल्याचं तपासादरम्यान कबूल केलं होतं. त्याआधारे पोलिसांनी त्या संबंधित मुलीनं पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं होतं. आता पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आलंय.
३१ जुलैच्या रात्री ८ वाजता या १९ वर्षांच्या मुलीवर सध्या अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी आणि इतर दोघांनी गँगरेप केला होता. पोलिसांनी या नवीन तक्रारीच्या आधारे दोघा जणांना ताब्यात घेतलंय.
३१ जुलैला घडलेल्या या सामूहिक बलात्काराची तक्रार त्या मुलीनं केली असती तर फ़ोटो जर्नालिस्टवर बलात्कार होण्याआधीचं हे आरोपी पकडले गेले असते. पण, तसं घडलं नाही. त्यामुळे मुलींवर कोणताही अन्याय झाला, तर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करणं अत्यावश्यक आहे. तरच महिलांवरचे अत्याचार रोखता येतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Tuesday, September 3, 2013 - 18:25


comments powered by Disqus