‘त्यांना’ मदत मिळालीच नाही, मृत्यूला उलटले सात महिने

(कृष्णात पाटील, प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शहीद नितिन इवलेकर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याला कारण ठरलं ते सात महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना झालेला उमेश पर्वतेचा मृत्यू. अग्निशमन दलातील या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अद्याप पालिकेकडून कसलीही मदत मिळालेली नाही. 

Updated: Jul 20, 2014, 10:45 PM IST
‘त्यांना’ मदत मिळालीच नाही, मृत्यूला उलटले सात महिने title=

मुंबई: (कृष्णात पाटील, प्रतिनिधी) मुंबई महापालिकेकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शहीद नितिन इवलेकर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. याला कारण ठरलं ते सात महिन्यांपूर्वी कर्तव्य बजावत असताना झालेला उमेश पर्वतेचा मृत्यू. अग्निशमन दलातील या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अद्याप पालिकेकडून कसलीही मदत मिळालेली नाही. 

डोळ्यातून अश्रू ढाळणाऱ्या मातेला मुलगा गेल्याचं दु:ख तर आहेच, त्याशिवाय मुंबई महापालिकेकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधातही त्यांचा राग आहे. कर्त्यासवरत्या मुलाच्या मृत्यूमुळं परळमधील एका छोट्याशा घरात राहणाऱ्या पर्वते कुटुंबियांचा आधारच तुटलाय. अग्निशमन दलात कार्यरत असलेले उमेश पर्वते २ डिसेंबर २०१३ रोजी कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात छपरावरून पाय घसरून पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु सात महिने उलटून गेले तरी या पर्वते कुटुंबियांना बीएमसीकडून अजून मदत मिळाली नाही. उमेशच्या भावाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचं आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी तेव्हा दिलं होतं. त्याचाही विसर बीएमसीला पडलाय.

अनेकदा पाठपुरावा करुनही अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन पर्वते कुटुंबियांच्या पदरात पडलं. ग्रॅच्यूएटी, पीएफ, विम्याची सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार आहे.

अंधेरीच्या आग दुर्घटनेत नितिन इवलेकरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला. उमेश पर्वते कुटुंबियांची होत असलेली परवड पाहूनच त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल. परंतु आश्वासन देणं माहित असलेल्या बीएमसी प्रशासनाला ते आश्वासन पाळण्याची सवय नाहीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.