गणेश विसर्जनासाठी पालिका, पोलिस सज्ज

सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Updated: Sep 8, 2014, 06:38 AM IST
गणेश विसर्जनासाठी पालिका, पोलिस सज्ज title=

मुंबई : सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांसह, प्रथमोपचार केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांसह बीएसएफ, एसआरपीएफ, नेवी आणि कोस्ट गार्डही सज्ज आहेत. 

अनंत चतुर्दशीला मुंबईचे रस्ते गर्दीने फुलून गेलेले असतात. या विघ्नहर्त्याच्या विसर्जनात कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून बीएमसी आणि मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय.

विसर्जनाला उसळणारी गर्दी लक्षात घेता सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

विसर्जन सुरळीत पार पडावं याकरता 47 हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. यापैकी 10 टक्के पोलिस कर्मचारी साध्या वेशात असणार आहेत. 

शिवाय एसआरपीएफच्या 10 आणि बीएसएफच्या 2 तुकड्याही सुरक्षेसाठी सज्ज आहेत. पोलिसांना सहकार्य करण्याकरता होम गार्ड, एनसीसी आणि विविध

एनजीओंचे जवळपास 10 हजार 500 स्वयंसेवक तयार आहेत. 

मुंबई शहरात एकूण 72 विसर्जन स्थळांबरोबरच 27 कृत्रिम तलावही तयार करण्यात आलेत. बीएमसीकडून विसर्जन स्थळांवर 404 जीवरक्षक, 71 नियंत्रण कक्ष, 55 मोटरबोट, 67 प्रथमोपचार केंद्र, 55 एम्बुलन्स तैनात असणारेत. तसंच 278 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेत. 

मुंबई महापालिकेचे 9 हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सज्ज असणार.
 
मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. त्यामुळं गणेश विसर्जन काळात घातपात टाळण्यासाठी मुंबई पोलीस संशयास्पद ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन्स राबवत आहे.

संरक्षणाच्या दृष्टीनं पोलिसांनी शहरामध्ये तर विसर्जन स्थळांवर मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केलीय. 

विघ्नहर्ता गणरायाच्या विसर्जनात कुठलंही विघ्न येवू नये यादृष्टीनं सर्व यंत्रणा सज्ज असल्या तरी गणेशभक्तांनीही दक्ष राहणं गरजेचं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.