कचरा व्यवस्थापनावर कोटींचा खर्च, पण कचरा तसाच!

By Jaywant Patil | Last Updated: Friday, May 3, 2013 - 20:51

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनावर १४०० कोटी खर्च करते. मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही पालिका शहरातील कचरा उचलत नाही असंच चित्र दिसतंय. पालिकेकडे वर्षाला मुंबईकरांनी ६५६२ तक्ररी करूनही कचराच उचला गेला नसल्याची नोंद पालिकेच्या हेल्पलाईनकडे झाली आहे.
मुंबई महापालिका दिवसाला साडेदहा हजार मेट्रिक टन कचरा गोळा करते. मुंबईतील या घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिका १४०० कोटी खर्च करते. शहरातील गोळा केलेला कचऱ्यावर देवनार, मुलुंड, कांजूरमार्ग इथल्या डंपिग ग्राऊंडवर शास्त्रोक्त पध्दतीने या कच-याची विल्हेवाट लावली जाते. मात्र तरीही मुंबईतील शुन्य कचरा नियोजनात पालिका अपयशी ठरलीय. पालिकेच्या हेल्पलाईनकडे २०१२ मध्ये मुंबईकरांनी ६५६२ तक्रारी कचरा उचलला गेला नसल्याच्या केल्या. या तक्रारींमध्ये २५३६ तक्रारी कचरा गोळा करण्यासाठी गाडी आलीच नाही याबाबत आहेत तर ८९० डेबरीजच्या आणि ८२६ कचरा रस्त्यातच पडल्याच्या आहेत.

प्रजा संस्थेच्या या पोलखोलीमुळे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचं बिंग फुटलयं. मात्र स्थायी समिती अध्यक्षांनी याचं खंडन केलंय. मुंबईकरांनी कचरा कचराकुंडीतच टाकावा यासाठी पालिकेनं प्रबोधनात्मक कार्यक्रमही राबवलाय. पालिकेचे क्लिन माशर्ल कचरा रस्त्यात टाकणारे आणि थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाईही करतात. २०११-१२ मध्ये याच क्लिन माशर्लनी ५ कोटीचा दंड वसूल केलाय. मात्र क्लिन माशर्लच्या दंडात्मक कारवाईचा अद्याप कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

First Published: Friday, May 3, 2013 - 20:51
comments powered by Disqus