मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर

न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली. 

Updated: Aug 23, 2016, 05:01 PM IST
मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी  न्या. डॉ. मंजुला चेल्लूर title=

मुंबई : न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली. 

न्यायमूर्ती चेल्लूर याआधी कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. त्यांची बदली करून त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या कॅबिनेटमधले अनेक महत्वाचे मंत्री उपस्थित होते. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या काळजीवाहू मुख्य न्यायाधीश विजया कापसे ताहिलरामाणी शपथविधीला उपस्थित होत्या. 

५ डिसेंबर १९५५ रोजी बल्लारी येथे जन्मलेल्या मंजुळा चेल्लूर यांनी बल्लारीच्या महिला महाविद्यालयातून कला स्नातक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९७७ साली त्यांनी बंगलोर येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. १९७८ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली. बल्लारी येथे प्रॅक्टिस करणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील होत्या.  अनेक बँका, कृषी उद्योग व संस्थांच्या विधी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. दिनांक १५ एप्रिल १९८८ रोजी त्यांनी कर्नाटक न्यायिक सेवेत प्रवेश केला व जिल्हा न्यायाधीश झाल्या. त्याच वर्षी त्यांना इंग्लंडच्या वार्विक विद्यापीठाची फेलोशिप मिळाली.

२१ फेब्रुवारी २००० रोजी त्यांची कर्नाटक मुख्य न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश (प्रथम महिला) म्हणून नियुक्ती झाली व त्यानंतर लगेचच १७ ऑगस्ट २००० रोजी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २००८ ते २०१० या काळात त्या कर्नाटक ज्युडीशियल अकादमीच्या अध्यक्षा होत्या. कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षा असताना न्या. चेल्लूर यांनी तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य केले.

२६ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली. ३ मार्च २०१३ रोजी बिजापूर येथील कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाने त्यांना त्यांच्या विधी क्षेत्रातिल योगदानाबद्दल डीलिट ही मानद पदवी प्रदान केली. ५ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली.