सावधान… मुंबईत २४ जुलैला ‘महाभरती’!

यंदा मुंबईच्या समुद्रात तब्बल सतरा वेळा महाभरती येणार आहे. या भरत्यांच्या काळासाठी मुंबई महापालिकेनं खास खबरदारी घेतलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदा मुंबईच्या समुद्रात तब्बल सतरा वेळा महाभरती येणार आहे. या भरत्यांच्या काळासाठी मुंबई महापालिकेनं खास खबरदारी घेतलीय. १३ जून ते २० सप्टेंबरच्या या काळात या महाभरत्या येणार आहेत. २४ जुलैला सर्वात मोठी भरती असणार आहे. या दिवशी ४.९५ म्हणजे पाच मीटरच्या लाटा उसळणार आहेत. या दिवशी नागरिकांनी खास खबरदारी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्यात.
मुंबईकराना सावधान करण्यासाठी मुंबई महापालिकेन पावसाळ्यातील २२ हायटाईडचे दिवस घोषित केले आहेत. मात्र, हायटाईडचे सूचना देणारे फलकच पालिकेन चौपाट्यावर लावले नाहीत. ‘झी २४ तास’नं याबद्दल पालिका प्रशासनाला विचारल्यानंतर आत्ता हायटाईडचे सूचना फलक लावण्याचा आदेश देण्यात आलेत.
दमदार बरसणाऱ्या पावसात समुद्राशी मस्ती करणं, हा मुंबईकरांचा आवडता उद्योग... पण मुंबईकरांनो जरा सांभाळून... मुंबईचे समुद्रकिनारे धोकादायक आहेत. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहूचा समुद्र, वर्सोवा, मढ, आक्सा, गोराई चौपाट्यांवर २०१२ मध्ये ४५ जणांचा बुडून मृत्यू झालाय. तरीही मुंबई महापालिकेला म्हणावं तसं गांभीर्य नाही. हायटाईडच्या दिवसांत मुंबईकरांनी समुद्र किनारी जाऊ नये, असं आवाहन महापालिकेनं केलंय. पण हायटाईडची सूचना देणारे फलक पालिकेनं चौपाट्यांवर लावलेले नाहीत. याबद्दल ‘झी मीडिया’नं प्रशासनाला विचारल्यानंतर आता हायटाईडचे सूचना फलक लावण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे मुख्य अधिकारी महेश नार्वेकर यांनी दिलीय.

मुंबई महापालिका आता लवकरात लवकर हायटाईडचे सूचना फलक लावेल अशी अपेक्षा आहे. पण, मुंबईकरांनीही तितकंच सहकार्य करणं अपेक्षित आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.