मुख्यमंत्र्यांच्या डोसनंतर आयएमएनं मागे घेतला संप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय. 

Updated: Mar 24, 2017, 02:09 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या डोसनंतर आयएमएनं मागे घेतला संप  title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच सरकार आता निवासी डॉक्टरांशी चर्चा करणार नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना अल्टिमेटम देत आक्रमक भूमिका घेतली होती. कामावर रुजू व्हा अन्यथा सरकार खपवून घेणार नाही. आम्ही हातावर हात धरून बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

इनअफ इज इनअफ, करदात्यांच्या पैशातून आपण डॉक्टरांना शिकवत असतो. मी पुन्हा डॉक्टरांना कामावर रुजू व्हायची विनंती करतो. रुग्णांना मरण्याकरता सोडणार असाल तर आम्ही यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिला आहे.

हा राजकारणाचा अड्डा आहे का? डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे, पण वागणं देवासारखं आहे का? तुम्हाला दानव म्हणायलाही लोक कमी पडणार नाहीत, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सुनावले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- आज तोडगा निघाला नाही तर सरकार हातावर हात घेऊन बसणार नाही

- जी कायदेशीर कारावाई करणे आवश्यक आहे ती कारवाई केली जाईल

- डॉक्टरांची ही मोठी असंवेदनशीलता आहे

- वेळ गेलेली नाही, मी पुन्हा एकदा डॉक्टरांना विनंती करतो कामावर रुजू व्हा

- मी शेवटची बैठक घेणार आहे

- रुग्णांना मरण्याकरता सोडणार असाल तर आम्ही यांना सोडणार नाही

- सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचे मी स्वतः लेखी दिले आहे

- उच्च न्यायालयाने कामावर रुजू व्हा सांगितले आहे, अजून काय करायचे, संयम किती दाखवायचा

- जनतेचा संयम सुटला तर आम्ही काय करणार

- तुम्ही सरकारचे, कोर्टाचे ऐकायला  तयार नाही