सिंधुरत्न दुर्घटना : नौदल प्रमुखांचा राजीनामा

`सिंधुरत्न`च्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुख एडमिरल डी के जोशी यांनी राजीनामा दिलाय. संरक्षण मंत्रालयाने जोशींचा राजीनामा स्वीकारलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 26, 2014, 10:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`सिंधुरत्न`च्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुख एडमिरल डी के जोशी यांनी राजीनामा दिलाय. संरक्षण मंत्रालयाने जोशींचा राजीनामा स्वीकारलाय. डीके जोशी यांच्या निवृत्तीला अजूनही १५ महिने बाकी होते. मात्र, आज भारतीय नौसेनेच्या `सिंधुरत्न` या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय. आता व्हाईस अॅडमिरल आर. के. धवन यांच्याकडे प्रभारी नौदल प्रमुखपद सोपवण्यात आलंय.
`सिंधुरत्न`चा अपघात...
भारतीय नौसेनेच्या सिंधुरत्न या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ झालेल्या अपघातात दोघेजण बेपत्ता झालेत. हे दोघेही पाणबुडीच्या कंपार्टमेंटमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पाणबुडीतील इतर सात जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टरनं आयएनएस अश्विनीवरिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलयं.
गुरुवारी, सकाळी हा अपघात झाला. ही पाणबुडी मुंबईजवळ समुद्रात ४० ते ६० नॉटिकल मैल अंतरावर  सराव करत असताना हा अपघात झालाय. ही पाणबुडी पाण्याखाली असताना एक कंपार्टमेंटमधून धूर येऊ लागला. तातडीनं अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि इतर कंपार्टमेंट सिल करण्यात आले. नौदलाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार यावेळी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पाणबुडीत नव्हता. पाणबुडी सुरक्षित असून आता तिला मुंबईकडे आणण्यात येत आहे.
किलो क्लास प्रकारातली ही पाणबुडी आहे.  रशियन बनावटीच्या डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाणबुडीचं किलो क्लास असं वर्गीकरण केलं जातं. किलो क्लास वर्गातील पाणबुडीला हा अपघात झालाय. या पाणबुडीतून धूर निघाल्याचंही सांगण्यात येतंय. या अपघातात दोन जण बेपत्ता असल्याची माहिती कळतेय... तर सात जणांना वाचवण्यात यश आलंय.  बाहेर काढण्यात आलेल्यांना नौसेनेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. सिंधूरत्नमध्ये धूर निघाल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नियमित सरावादरम्यान ही घटना घडली असल्याचं नौदलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी झी मीडियाला सांगितलंय.
* आयएनएस सिंधुरत्न किलो क्लासमधील नौदलात दाखल झालेली
* २२ डिसेंबर १९८८ - नौदलाच्या सेवेत दाखल 
* २००१ ते २००३ मध्ये सिंधुरत्नचं नुतनीकरण पूर्ण 
* पाण्याखालून, पृष्ठभागावरून ३०० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता
अपघातांनी नौसेना ग्रस्त...
गेल्याच वर्षी १४ ऑगस्ट २०१३ ला `सिंधुरक्षक` या  किलोक्लासमधीलच पाणबुडीचा स्फोट होऊन आग लागली होती. आणि त्यात  ३ अधिकाऱ्यांसह १८ नौसैनिकांचा बळी गेला होता. पाणबुडयांच्या वारंवार होत असलेल्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त होतेय. एक नजर टाकूयात या अपघातांच्या मालिकांवर...
* २२ जानेवारी २०१४ - आयएनएस बेटवा युद्धनौकेला अपघात
* १३ मार्च २०१३ - सिंधुरक्षक
* २४ डिसेंबर २०१३ - आयएनएस तलवार
* ३० सप्टेंबर २०१३ - आयएनएस विराटमध्ये आग
* ९ डिसेंबर २०१३ - आयएनएस कोकणला अपघात

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.