दहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टात, मंडळांनी मागितली सवलत

जय जवान गोविंदा पथकाची सुप्रीम कोर्टात धाव

Updated: Aug 24, 2016, 09:59 AM IST
दहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टात, मंडळांनी मागितली सवलत title=

मुंबई : जोगेश्वरी येथे मानवी थरांचा विश्वविक्रम करणारं जय जवान गोविंदा पथक बुधवारी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथक रिट याचिका दाखल करणार आहे.

कोर्टानं पुन्हा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती ते याचिकेतून करणार आहेत. उत्सवावर निर्णय घेताना गोविंदा पथकाचे मत विचारात घ्यावे अशी विनंती ते या याचिकेतून करणार आहेत.. दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षेची सर्व हमी देण्यास आणि उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याची तयारी या मंडळानं दर्शवलीय. शिवाय  गिनीज बुकमध्ये नोंद झालेला विश्वविक्रम परत करण्याची सध्या कोणतीही भूमिका नाही असं स्पष्टीकरणही जय जवान गोविंदा पथकाकडून देण्यात आलंय.

दहीहंडी उत्सवात हंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक असू नये आणि १८ वर्षांखालील गोविंदा असू नयेत, या न्यायालयीन आदेशात यंदाच्या उत्सवापुरती सवलत द्यावी, अशी विनंती जय जवान गोविंदा पथकाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला. त्यावर आज सुनावणी होऊ शकते.