LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

Last Updated: Thursday, June 21, 2012 - 18:40

www.24taas.com, मुंबई 

 

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

 

केवळ ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलानं घटनास्थळी उपस्थित व्हायला जवळजवळ पुढचा अर्धा तास घेतला. त्यासाठी रोड मॅप मिळाला नसल्याचं कारण सांगण्यात येतंय. पण, अग्निशमन दलाच्या या बेजबाबदार कारभारावर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अग्निशमन दलात अधिकारी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेल्या सुरेश देशमुखांनी सडकून टीका केलीय. ‘मुंबई फायरब्रिगेड आणि फायर अॅडव्हायजर यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ऑफिसमधली आग विझवणं ही अग्निशमन दलासाठी सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण तिथं फक्त लाकडं आणि कागदं असतात. ती आग आटोक्यात आणता येत नसेल तर हे अग्मिशमन दलाचं अपयश आहे. भरीस भर म्हणून आग विझवण्याच्या यंत्रणाही बंद पडल्या. हे सर्व झालं कारण फायर अॅडव्हायजर अननुभवी होता. त्यामुळेच आग पसरू नये ही प्राथमिक काळजीही इथं घेतली गेली नाही’ असे गंभीर आरोप देशमुख यांनी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांवर केले आहेत. याचबरोबर, प्रत्येक आगीला शॉर्ट सर्किट कारण कसं असू शकतं. पण, हे कारण सांगितलं की त्याची चौकशी तिथंच थांबते, अशी शंकाही देशमुख यांनी उपस्थित केलीय. आपण फायर ब्रिगेडमध्ये काम केलं हे आता मला सांगण्याचीही लाज वाटतेय, असं त्यांनी शेवटी उद्विग्नतेने म्हटलं.

 

या आगीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासोबतच शालेय शिक्षण, वन विभाग खाक, मुख्य सचिवांचं ऑफिस, कंट्रोल रुम जळून खाक झालंय. फोर्स वनच्या तुकड्या, नौदलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झालेत. दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं गेलं असून या दुर्घटनेची चौकशी करणार असल्याचं महाराष्ट्र सरकारनं म्हटलंय.

 

.

First Published: Thursday, June 21, 2012 - 18:40
comments powered by Disqus