या मुद्यांवरून गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

(दीपक भातुसे, झी २४ तास)  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज विरोधकांच्या दमदार हजेरीने सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात एकजुटीने उभ्या राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी हे अधिवेशन वादळी ठरणार याची चुणुक दाखवून दिली. 

Updated: Jul 13, 2015, 06:00 PM IST
या मुद्यांवरून गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस title=

मुंबई : (दीपक भातुसे, झी २४ तास)  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज विरोधकांच्या दमदार हजेरीने सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारविरोधात एकजुटीने उभ्या राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनी हे अधिवेशन वादळी ठरणार याची चुणुक दाखवून दिली. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, मंत्र्यांचे घोटाळे या मुद्यावरून विरोधकांनी पहिल्याच दिवशी सरकारला घेरले आणि सरकारसमोर मोठे आव्हान उभे केले. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षात फुट असल्याने मुख्यमंत्र्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

राज्यात १५ वर्ष सत्ता उपभोगलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करताना पहायला मिळाले. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते आणि माजी मंत्री होते.

राज्यात सत्ताबदल होऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आपण विरोधक असल्याची जाणीव झाल्याचे खऱ्या अर्थाने पहायला मिळाले. पावसाळी अधिवेशाच्या सुरुवातीलाच सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपसातील मतभेद बाजूला ठेवले आणि विरोधक म्हणून ते एकत्र आले.

विरोधकांच्या एकीची ताकद दाखवत या नेत्यांनी सरकारविरधात प्रचंड घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय हे अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतली.

राज्यात युतीचे सरकार आहे. मात्र सत्तेमध्ये सहभागी असलेला शिवसेना पक्षही भाजपावर टीका करत सुटलाय. एकीकडे विरोधी पक्षांची ऐकी झालेली असताना सरकारमध्ये दुही निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मंत्र्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

विरोधकांकडे सरकारविरोधात मुद्यांचा तोफगोळा आहे. 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच
शेतकऱ्यांची आत्महत्या
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या खात्यातील वादग्रस्त खरेदी
विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांची बोगस डिग्री
रणजित पाटील यांच्याविरोधातील मुद्दे
राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था

अशा अनेक मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात भाजपाला किती अडचणीत आणणार आहेत याची झलक पहिल्या दिवशी पहायला मिळाली आहे. पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

आतापर्यंत एकत्र नसलेले विरोधक आता एकवटले आहेत. तर सत्ताधाऱ्यांमध्ये फुट पडल्याचे चित्र आहे. निश्चितच याचा फायदा विरोधकांना होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांचा सामना करताना मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.