दादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!

सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 10, 2014, 05:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय. त्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. याच पार्श्वभूमिवर महाराष्ट्र सरकारनं सोशल मीडियावर नियंत्रणासाठी पावलं उचलण्याची मागणी केंद्राकडे केलीय.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, सोशल मीडियाला मर्यादा घालण्याचा आमचा मानस नाही परंतु, ज्याप्रमाणे चीननं केलंय त्याप्रमाणे एक दोन वर्षांसाठी देशात सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही पावलं उचलली जावी, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत, असं म्हटलंय. सोमवारी विधासभेत बजेटवर चर्चा करताना अजित पवार यांनी हे विधान केलंय.
अजित दादांच्या वक्तव्यानं विधानसभेतही गोंधळ
अजित पवारांनी सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचं वक्तव्यं करताच सत्ताधारी बाकांवरील काही तरुण सदस्य चांगलेच चपापले... यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत आलेल्या अजित दादांचं हे वक्तव्यही वादग्रस्त ठरू शकतं, मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान धोकादायक ठरू शकतं... तरुण मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, असं अंदाज आल्यानं अजित दादांचे सचिव संजय देशमुख यांनी सभागृहातील अधिकाऱ्यांच्या गॅलरीत धाव घेतली. तातडीनं अजितदादांना एक चिठ्ठी लिहून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याची सूचना केली. त्यानंतर दादांनी समाजात तेढ निर्माण करणारे असेच काही प्रकार चीनमध्ये घडले होते. तेव्हा चीन सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली होती. या धर्तीवर सोशल मीडियावर एक-दोन वर्षे बंदी घालण्याकरिता केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.