'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी

विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय. 

Updated: Nov 11, 2014, 03:48 PM IST
'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी  title=

मुंबई: विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय. 

'वेगळा विदर्भ किंवा वेगळ्या खान्देशचा उल्लेख करु नका' असं गावित यांनी बजावलंय. दरम्यान, जय विदर्भची घोषणा देणाऱ्या आमदारांचं निलंबन करण्याची शिवसेनेची मागणी मात्र हंगामी अध्यक्षांनी फेटाळून लावलीय. 

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सुरु असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी १२ ऐवजी दुपारी दुपारी ३ पर्यंत मुदतवाढ द्यावी असं शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं. यानंतर शिवसेना आमदारांनी गोंधळ घातला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेना आमदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना आमदारांनी विरोध सुरुच ठेवला. अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी तीनपर्यंत वाढवली आणि त्यानंतर विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरु झालं. 

नवनियुक्त भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी शपथ घेतल्यावर जय विदर्भ असा नारा दिला. यावरही शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला. अशा घोषणेमुळं महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचं शिवसेना आमदारांनी सांगितलं. अखेरीस हंगामी अध्यक्ष गावित यांनी आमदारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारे विधान करु नये असे आदेश दिले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.