काँग्रेस `चार` मंत्र्यांना हटवणार की `दोन`?

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

Updated: May 31, 2014, 04:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.
यात चार वरिष्ठ मंत्र्यांना मतदारसंघाचा `रस्ता` दाखवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पराभवाची कारणे हायकमांडपर्यंत पोहोचवण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची शुक्रवारी सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाली.
या बैठकीत राज्य प्रभारी मोहन प्रकाश, सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल उपस्थित होते. पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, असे सांगत सोनिया यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष बदलण्यास नकार दिला. मात्र, त्याचवेळी मंत्रिमंडळात बदल करण्याच्या सूचनाही सोनिया यांनी दिल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला पिछाडी मिळाली, त्या मंत्र्यांवर यामध्ये कुऱ्हाड पडू शकते. हा शिक्षेचा भाग नसून या मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करावे आणि पक्षसंघटनेला बळकटी द्यावी, असा यामागील उद्देश आहे, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात शनिवारी निर्णय होऊ शकतो. या चार जणांना हटवल्यानंतर काँग्रेसकडून आपल्या कोटय़ातील तीन रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सात नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
या चार जणांना पद सोडावं लागणार?
शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणत्या वरिष्ठ मंत्र्यांना हटवायचे याबाबत चर्चा झालेली नाही. मात्र, मंत्रिमंडळाच्या फेरबदलामध्ये नारायण राणे, पतंगराव कदम, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यापैकी चौघांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे.
अर्थात चार मंत्र्यांना हटवायचे की दोन मंत्र्यांना याचा निर्णयही अद्याप झालेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.