‘द्रौपदींनो’ घाबरु नका... ‘मनसे’ तुमच्या पाठिशी आहे!

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विनोद घोसाळकरांविरोधात आपली मानसिक छळवणूक केल्याची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाला दखल घ्यावी लागली पण, शिवसेनेनं मात्र आपल्या पक्षातील ‘द्रौपदीं’साठी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे या ‘द्रौपदीं’च्या मदतीला शिवसेनेचा भाऊ ‘मनसे’ मैदानात उतरलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 17, 2014, 06:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विनोद घोसाळकरांविरोधात आपली मानसिक छळवणूक केल्याची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाला दखल घ्यावी लागली पण, शिवसेनेनं मात्र आपल्या पक्षातील ‘द्रौपदीं’साठी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे या ‘द्रौपदीं’च्या मदतीला शिवसेनेचा भाऊ ‘मनसे’ मैदानात उतरलाय.
आपण महिला नगरसेविकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचं दाखवत मनसे सैनिकांनी थेट महापौरांचं दालन गाठलं. महापौरांना घेराव घालत मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवली – दहिसरमधील शिवसेना नगरसेविकांच्या बाजुने त्यांना जाब विचारला. ‘द्रौपदींनो’ घाबरु नका... ‘मनसे’ तुमच्या पाठिशी आहे, असं सांगत तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रकार मनसेना केला खरा... मात्र, इथंच मनसेची गोची झाली. कारण, शिवसेनेच्या इतर नगरसेविकांनी मात्र ‘आम्ही आमचं बघून घेऊ’ असं म्हणत त्यांना तिथंच रोखलं.
`आमची एक सहकारी नगरसेविका गेल्या आठ-दहा दिवसांपासून न्यायाची याचना करत आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रश्न एखाद्या पक्षापुरता उरलेला नाही. एखाद्या महिलेची रस्त्यात छेड काढली जात असताना आम्ही गप्प कसे बसणार?` असा प्रश्न यावेळी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी विचारत मनसे नगरसेविकांचं नेतृत्व केलं.
मुंबईतील सर्व महिला नगरसेविकांच्या पाठीशा पालिका सभागृह ठामपणे उभे आहे. त्यांना संरक्षणाची हमी देत आहे, असा एकमुखी ठराव करावा, अशी जोरदार मागणी या नगरसेवकांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना आणि मनसे नगरसेविकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे इथं काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, त्यांचा मुलगा व एका बिल्डरविरोधात विनयभंग व मानसीक खच्चीकरणाची तक्रार केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. यानंतर आज विनोद घोसाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कालच राष्ट्रीय महिला आयोगानेही याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.