राज ठाकरेंच्या निर्णयामुळं मनसेत नाराजी

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेला आज ग्लॅमरचा तडका देण्यात आला. मराठी हिंदी सिनेसृष्टीतल्या स्टार्सच्या आज थेट पदांवर नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी संघटनेत कठोर फेरबदलही केलेत. एकीकडे राज कुंद्रा प्रकरणात वादात सापडलेल्या नेत्यांना अभय देण्यात आलं. पण त्याचवेळी याप्रकरणाशी संबंधित पदाधिकाऱ्यांना पदावरुन हटवल्यानं पक्षात नव्या वादाला तोंड फुटलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 18, 2013, 09:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेला आज ग्लॅमरचा तडका देण्यात आला. मराठी हिंदी सिनेसृष्टीतल्या स्टार्सच्या आज थेट पदांवर नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी संघटनेत कठोर फेरबदलही केलेत. एकीकडे राज कुंद्रा प्रकरणात वादात सापडलेल्या नेत्यांना अभय देण्यात आलं. पण त्याचवेळी याप्रकरणाशी संबंधित पदाधिकाऱ्यांना पदावरुन हटवल्यानं पक्षात नव्या वादाला तोंड फुटलंय.
महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, केदार शिंदे याआधी निवडणुकीत मनसेसाठी प्रचारात उतरणारं हे तारांगण आता थेट पक्षासाठी काम करणार आहे. या ताऱ्यांनी पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे सदस्य होऊन याआधीच प्रवाहात उडी घेतली होती. आता तर त्यांची थेट संघटनेच्या उपाध्यक्षपदीही वर्णी लागलीय.
पदांवर वर्णी लावताना राज ठाकरे यांनी काही पदाधिकाऱ्यांचे पंख छाटलेत. यात विलास सुद्रिक यांचा समावेश आहे. उद्योगपती राज कुंद्रा यांच्या मालिकेच्या चित्रिकरणावेळी सेटवर तोडफोड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सुद्रिक यांच्या उचलबांगडीचा आणि कुंद्रा प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचा दावा चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलाय.

याआधीही विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनसेच्या अंगीकृत संघटना खंडणीखोरीच्या आरोपांमुळं वादात सापडल्या होत्या. रस्ते व आस्थापना, वाहतूक, कामगार अशा संघटनांच्या कार्यकारिणीत राज ठाकरेंनी फेरबदल तसंच बरखास्त्याही केल्या होत्या. मात्र ते करताना संघटनेतल्या बड्या पदाधिकाऱ्यांना झुकतं माप देण्यात आल्याची चर्चा होती. आता चित्रपट कर्मचारी सेनेच्या बाबतीतही हाच कित्ता गिरवण्यात आल्याचा आरोप पक्षात करण्यात येऊ लागलाय.
चित्रपट कर्मचारी सेनेतल्या पदाधिकांऱ्याचे प्रताप ऐकल्यावर ठाकरेंनी तमाम फिल्म इंडस्ट्रीला पत्र लिहून गैरप्रकार थांबवण्यासाठी थेट संपर्क साधण्याचं आवाहन केलं खरं, पण सुद्रिकांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर एक प्रश्न उपस्थित होतोच. तो म्हणजे त्यांना कुंद्रांच्या सेटवर जाऊन तोडफोड करण्याचे आदेश देणारे नेते कोण? तोडफोडीनंतर सुद्रिक यांनी नैराश्येच्या भावनेत केलेला आत्महत्येचा प्रयत्न आणि त्यासाठी त्यांनी संघटनेतल्या नेत्यांनाच जबाबदार धरणं, हे प्रश्न संघटनेतल्या फेरबदलांनी सुटणार आहेत का? हे प्रश्न उपस्थित होतायेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.