मनसे म्हणतंय... रद्दी द्या रद्दी!

By Jaywant Patil | Last Updated: Friday, March 15, 2013 - 10:31

www.24taas.com, मुंबई
दुष्काळात होरपळणा-या जनतेला मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावलेत. यासाठी नवनवीन कल्पना ते राबवताना दिसतायत. मुंबईत मनसेच्या लोकप्रतिनिधीने राबविलेल्या संकल्पनेनं तर अनेकांच्या भुवयाच उंचावल्यात...लोकांच्या घरची रद्दी विकून उभ्या राहणा-या पैशातून दुष्काळग्रस्तांना मदत केली जाणार आहे.
तर मग तुम्ही तुमच्या घरची रद्दी विका, असं आवाहन करणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर हे आहेत मनसे विधीमंडळाचे गटनेते बाळा नांदगावकर. नांदगावकरांनी आपल्या शिवडी मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या घरातील रद्दी मनसेकडे जमा करण्याचं आवाहन केलं आहे. जवळपास 3 वर्षांपूर्वी मतं मागण्यासाठी घरोघरी फिरणारे नांदगावकर आणि त्यांचे कार्यकर्ते आता मतदारांकडे रद्दी मागत फिरतायत. गोळा केलेली रद्दी विकून यातून उभा राहणारा पैसा नांदगावकर दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देत आहेत.

आपल्या नेत्याच्या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी कार्यकर्तेही जीव ओतून काम करतायत. लोकांना या संकल्पनेचा हेतू पटलाय, त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यात अशा काळात समाजकार्य आणि त्याला जनसंपर्काची जोड देऊन मतदारांना आकर्षित करण्याची संधी नांदगावकरांनी अचूक साधलीय.

First Published: Thursday, March 14, 2013 - 20:43
comments powered by Disqus