तूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा

तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Updated: Apr 24, 2017, 10:11 PM IST
तूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा  title=

मुंबई : तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारनं सगळी तूर खरेदी केंद्र येत्या २४ तासांमध्ये सुरू करावीत आणि शेतकऱ्यानं आणलेली तूर ताबडतोब हमीभावानं खरेदी करावी, अन्यथा मनसेला राज्यभर आंदोलन करावं लागेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने ह्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली, पण पहिल्यापासूनच त्यात अनेक गोंधळ घातले गेले. गोदामात जागा शिल्लक नसल्याची, बारदान उपलब्ध नसल्याची आणि वजनकाटे नसल्याची कारणं देण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. शेतकरी तूर घेऊन आले पण त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. ह्यातून सरकारचा उद्देश स्पष्ट समोर आल्याची टीकाही मनसेनं केली आहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शेतकरी घेऊन आलेली सगळी तूर खरेदी करू असं आश्वासन दिलं होतं, पण सरकारकडून शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचा आरोपही मनसेनं केला आहे.