शिवसेना झालाय दलालांचा पक्ष - रावले

मुंबईत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन रावले यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी अतीशय तीव्र शब्दांत व्यक्त केलीय.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी नुकतीच मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी अतीशय तीव्र शब्दांत व्यक्त केलीय.

केवळ शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची भेट घेण्यासाठी चार वर्षे लागली, असं म्हणत मोहन रावले यांनी सेनेच्या नेतृत्वावर टीका केलीय. याचवेळी त्यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केलीय. ‘मिलिंद नार्वेकरांनीच शिवसेनेची वाट लावली... असंख्य शिवसैनिकांपेक्षा नार्वेकर महत्त्वाचे आहेत काय?... त्यांचे एवढे लाड कशासाठी?’ असं म्हणत त्यांनी नार्वेकरांवर तोफ डागलीय. ‘शिवसेनेचा रिमोट नार्वेकरच्या हातात जातोय… खरा अस्तनितला निखाला नार्वेकरच आहे... ‘ असं म्हणत शिवसेना हा आता दलालांचा पक्ष झालाय... हा आता बाळासाहेबांचा पक्ष राहिला नाही’ अशी खंत त्यांनी व्यक्त केलीय.

एवढंच नाही तर, याच मिलिंद नार्वेकरमुळे शिवसेनाप्रमुख पद सोडणार होते, असं रावले यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्द्यालाही हात घातला. ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पवारांसमोर लोटांगण कशाला?’ असा सवाल विचारत रावलेंनी शिवसेनेच्या दुखऱ्या भागावरच वार केलाय.

शिवसेनेत नाराज असलेल्या रावलेंनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. याविषयी बोलताना ‘ही काही राजकीय भेट नव्हती तर व्यक्तीगत पातळीवर राज ठाकरेंची भेट घेतली होती... पण, त्यावरही उगाचच काहूर माजवलं’ असंही त्यांनी म्हटलंय. ‘कुणाचीही माफी मागणार नाही’ असं म्हणत रावले यांनी बंडाची भूमिका स्वीकारलीय.

मोहन रावले यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.