`पाच कोटींमध्ये आमदारकी मिळवून देतो...`

मुंबईत जुहू इथं राहणाऱ्या मनोज तिवारी यांना काँग्रेसकडून विधान परिषदेत आमदारकी मिळवून देतो, असं सांगून हितेश झवेरी आणि पराग शहा या तरुणांनी तब्बल पाच कोटींना गंडा घातला आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 3, 2013, 01:25 PM IST

www.24taas.com, मुंबई
निवडणुकीतल्या तिकिटांचा काळाबाजार आपण वारंवार ऐकतो... मात्र, हे सत्य असल्याचं आता उघडपणे समोर आलंय. मुंबईत जुहू इथं राहणाऱ्या मनोज तिवारी यांना काँग्रेसकडून विधान परिषदेत आमदारकी मिळवून देतो, असं सांगून हितेश झवेरी आणि पराग शहा या तब्बल पाच कोटींना गंडा घातला आहे. या प्रकरणात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अनेक जण सामील असल्याच बोललं जातंय. याप्रकरणी क्राईम ब्रँचनं पराग आणि त्याची पत्नी जिग्ना शहा यांना अटक केलीय.
हितेश झवेरी आणि पराग शहा... या दोघांवर पाच कोटी रुपयांच्या बदल्यात काँग्रेस पक्षाची आमदारकी मिळवून देत कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप मुंबईतल्या मनोज तिवारी यांनी केलाय. दिल्लीतल्या एका बड्या नेत्याशी संबंध असल्याचं सांगून त्यांनी पाच कोटी उकळल्याचा आरोप तिवारींनी केलाय.
पैसे उकळणाऱ्यांचे थेट दिल्लीतल्या एका बड्या नेत्याशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट तिवारींनी केलाय. इतकंच नाहीतर पैसे उकळणाऱ्या हितेश आणि पराग यांनीच दिल्लीतल्या बड्या नेत्यांशी भेट घालून दिल्याचं तिवारींनी तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी तिवारींनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. मात्र, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आलाय.

याप्रकरणी आरोपी हितेश झवेरी आणि पराग शाहचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलाय. आता क्राईम ब्रान्च या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आमदारकीसाठी पैसे उकळणाऱ्यांचा पर्दाफाश करणार का? की राजकीय नेत्याचं नाव आल्यानं प्रकरणाची फाईल पोलीस दफ्तरी धूळ खात पडणार? का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.