राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मुंबई पालिका नोटीसीमुळे बेघर होण्याचा प्रसंग

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या मोहित दळवीला महापालिकेच्या एका नोटीशीमुळे बेघर व्हायची वेळ आलेय.

Updated: Mar 4, 2016, 09:20 AM IST
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मुंबई पालिका नोटीसीमुळे बेघर होण्याचा प्रसंग  title=

मुंबई : राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या मोहित दळवीला महापालिकेच्या एका नोटीशीमुळे बेघर व्हायची वेळ आलेय. मात्र महापालिका गटनेत्यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालत मोहितला स्वतःच्या हक्काचं नवं घर देण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यामुळे त्याला घर मिळणार का, याकडे लक्ष लागलेय. 

यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता मोहित दळवीची घरासाठीची परवड अजून संपलेली नाही. महापालिकेनं मोहितचं मलबार हिलमधील बाणगंगा काठावरचं घर अनधिकृत ठरवत, त्यावर कारवाई करण्याची नोटीस बजावली होती.

 

टीचभर जागा असलेल्या या पडक्या घरात मोहित त्याच्या जन्मापासून राहातो. मोहितच्या लहानपणीच आई-वडीलांचं छत्र हरपलं. मोहितची आत्या घरकामं करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दोन वर्षांपूर्वी मोहितनं बाणगंगामध्ये बुडणा-या एका मुलीचे स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्राण वाचवले होते. त्याच्या या शौर्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती.

यंदा जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्ते मोहितला त्यानं दाखवलेल्या धाडसाबद्दल गौरवण्यात आलं. पण एकीकडे मोहित दिल्लीत पुरस्कार स्वीकारत असताना दुसरीकडे महापालिकेनं त्याच्या घरावर कारवाईची नोटीस बजावली होती. त्यावेळी बेघर होण्याच्या संकटानं दळवी कुटुंबाला हादरवून टाकलं होतं.

यापूर्वी मोहितच्या घरी साधा वीजपुरवठाही नव्हता. मात्र मोहितच्या धाडसी कृतीची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर बेस्ट व्यवस्थापनानं मोहितच्या शौर्याची दखल घेत त्याच्या घरी वीज जोडणी दिली होती. आता मोहितच्या घरावर आलेल्या संकटाचीही महापालिका नेत्यांनी गांभीर्यानं दखल घेतलीय. 

बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी मोहित आणि त्याच्या कुटुंबियांना हक्काचं नवं घर देण्याच प्रस्ताव गटनेत्यांची बैठकीत मांडला. या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देत तो प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलाय. महापालिका गटनेत्यांनी लक्ष घातल्यानंतर तरी मोहितच्या घराची परवड सुटेल, अशी अपेक्षा आहे.