मुंडे, मुख्यमंत्र्यांचं `क्रिकेट`, की पवारांना `चेकमेट`?

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, September 17, 2013 - 17:49

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पिचवर राजकारणाचे वारे जोरात वाहू लागलेत. शरद पवारांना आव्हान देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरले असताना, भाजप नेते गोपीनाथ मुंडेही पॅड बांधून मैदानात उतरलेत.
महत्वाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ज्या माझगाव क्रिकेट क्लबकडून मैदानात उतरले त्याच क्लबचे सेक्रेटरी शाहआलम हे स्टायलो क्रिकेट क्लबचेही मालक आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि गोपीनाथ मुंडे यांना क्रिकेटच्या मैदानात उतरवणारा समान दुवा एकच आहे. एमसीएच्या पीचवर पवारांविरुद्ध काँग्रेस-भाजपचा पॉवर प्ले सुरू झालाय की काय, अशी चर्चा आता रंगलीय... हा निव्वळ योगायोग की चव्हाण-मुंडेंची आखीव रणनीती, याबाबत नानाविध तर्क लढवले जात आहेत.
एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणी क्रिकेटच्या पीचवर उतरलेत. शरद पवारांनी याआधीच एमसीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत एमसीएमध्ये एंट्री घेतली. त्यामुळं एमसीए निवडणुकीत पवार विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
त्यातच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केलीय. मुंडेंनी स्टायलो क्लबचं प्रतिनिधीत्व स्वीकारलं असून क्लबकडून मुंडे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळतेय. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पारशी झोराष्ट्रीयन क्लबकडून ते निवडणूक लढवणार आहेत. एकूणच राजकारण्यांच्या सहभागामुळं एमसीएचे रवी सावंत मात्र नाराज झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013 - 17:49
comments powered by Disqus