ISIS विरोधात मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दंड थोपटलेत

 देशातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दहशतवादाच्या विरोधात दंड थोपटलेत.

Updated: Dec 22, 2015, 11:49 PM IST
ISIS विरोधात मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दंड थोपटलेत title=

मुंबई : देशातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दहशतवादाच्या विरोधात दंड थोपटलेत. विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉशिंग करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा आयसिससारख्या संघटनांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संस्थेमधले प्राध्यापक सज्ज झालेत.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेची नजर भारतीय मुस्लिम तरुणांवर असल्याचं वारंवार समोर येतंय. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तरुणांना ओढण्याचा आणि त्यांचं ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला पायबंध घालण्यासाठी देशातली सर्वात मोठी आणि जुनी मुस्लिम शिक्षणसंस्था सरसावलीये. अंजुमन-ए-इस्लामनं आयसिसविरोधात दंड थोपटलेत. पदवीचा विद्यार्थी असलेल्या मोईजला त्याचे प्राध्यापक सल्ला देतायत. विद्यार्थ्यांनी अतिरेकी विचारांपासून सावध असावं, यासाठी प्राध्यापक मंडळी सर्व विद्यार्थ्यांचा दररोज संपर्कात आहेत.

अंजुमन-ए-इस्लाम संस्थेची राज्यभरात 98 शाळा, कॉलेजेस आहेत. यात 1 लाखाहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे संस्थेनं छेडलेल्या या दहशतवादविरोधी मोहीमेचं महत्त्व जास्त आहे.

आयसिससारख्या दहशतवादी संघटना जिहाद या शब्दाचा वापर करून माथी भडकवण्याचं काम करतात. जिहाद याचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगणं, हे अंजुमन-ए-इस्लामच्या या लढाईतलं सर्वात मोठं हत्यार आहे.