कहर... दुर्घटनेतील जखमींकडे डॉक्टरांनी मागितले पैसे!

माझगाव डॉकयार्डमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेकडून रक्त तपासण्यासाठी इथल्या डॉक्टरांनी निर्लज्जपणे पैसे मागितले. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 1, 2013, 12:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी असंवेदनशिलतेचा कळस गाठल्याची घटना उघड झालीय. माझगाव डॉकयार्डमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेकडून रक्त तपासण्यासाठी इथल्या डॉक्टरांनी निर्लज्जपणे पैसे मागितले. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली.
याप्रकरणी जखमी श्वेता कांबळे यांनी तक्रार केल्यानंतर तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलंय तर सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश महापालिकेनं दिले आहेत.
सिद्धार्थ, हाफिजा आणि तायडे असं या कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी चार सदस्यीय समितीला तीन ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

२७ सप्टेंबर रोजी डॉकयार्ड भागातील इमारत धाडकन कोसळली होती. यामध्ये आत्तापर्यंत ६१ जण बळी पडल्याचं घोषित करण्यात आलंय. या दुर्घटनेनंतर आपत्ती कोसळलेल्या या जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं मुंबई महानगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आलं होतं. अगोदरच कहर कोसळलेल्या आपलं सर्वस्व या इमारतीखाली गमावलेल्या जखमींकडे नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी पैसे मागितल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.