नरेंद्र दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची होणार चौकशी

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्या प्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत.  

Updated: Jun 18, 2016, 11:44 PM IST
नरेंद्र दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची होणार चौकशी title=

मुंबई : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्या प्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात तीन आजी-माजी पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश असल्याचं समजतंय. रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगलीत कदम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना हायकोर्टानं जामीन दिलाय. फरार आरोपी सारंग अकोलकर, रुद्र पाटील, विनय पवार आणि प्रवीण निमकर या सनातन साधकांना या आजी माजी अधिका-यांनी प्रशिक्षण दिल्याचे सीबीआयच्या बड्या अधिका-यांचे म्हणणे आहे. 

शिवाय डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं रिव्हॉल्वर बनविण्यातही या आजी-माजी अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही संशय आहे. मनोहर कदम यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केलाय. मी कधीही कोणत्याही आश्रमात गेलेलो नाही. कोणालाही प्रशिक्षण दिलेले नाही. मला यात गोवण्यात येत आहे. मी कोणाची कधीही भेट घेतलेली नाही, असा खुलासा कदम यांनी केलाय.