नरेंद्र मोदी मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या भेटीला

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, June 27, 2013 - 15:19

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मातोश्री जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजीत दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची भेट नव्हती. मात्र, मोदींनी मुंबई दौऱ्यात उद्धव यांची भेट घेतली.
दोन दिवसांपूर्वी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे मोदी विरूद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, उद्धव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदीविषय वेगळा आहे. वृत्तपत्रातील चर्चेचा राजकीय अर्थ काढू नये, असे म्हटले होते. यापार्श्वभूमीवर मोदी यांची भेट महत्वाची मानली जात आहे.
मोदींनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे ठरविल्यानंतर मातोश्रीवर भाजचे प्रदेशाध्यक्ष दवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेतेही गेलेत. या भेटीच्यावेळी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मोदी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
मोदींचे मुंबईत भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताच्यावेळी भाजचे जवळपास सर्वच नेते उपस्थित होते. मात्र, माजी अध्यक्ष नितीन गडकरी उपस्थित नसल्याने चर्चा सुरू झाली. गडकरी नाराज आहेत का? परंतु गडकरी हे नवी दिल्लीत असल्याने ते उपस्थित राहिलेले नाही. त्यांचा दिल्लीत एका शिष्टमंडळाशी महत्वाची बैठक असल्याचे भाजपसूत्रांकडून सांगण्यात आलेय.

भारतीय लोकशाहीचा प्रवास, त्यातील स्थित्यंतरे, व्यवस्था बदलांच्या चर्चांपासून आजवर झालेल्या विविध प्रयोगांच्या चिंतनाचा लेखाजोखा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या `बियाँड अ बिलिअन बॅलट्स` या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने मोदी मुंबईत आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, June 27, 2013 - 15:02
comments powered by Disqus