राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.

Updated: Sep 18, 2014, 04:49 PM IST
राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.

सध्या महाराष्ट्रातलं वातावरण काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात आहे. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीसाठी मात्र अनुकूल चित्र दिसतंय. यामुळंच अनेक नेते काँग्रेस - राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश करतायत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. राष्ट्रवादीने निम्म्या म्हणजेच 144 जागांची मागणी केलीय. तर काँग्रेस एवढ्या जागा सोडायला तयार नाही.

यामुळं राष्ट्रवादीनं स्वबळाची भाषा सुरू करून, सर्वच्या सर्व म्हणजे २८८ मतदारसंघासाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र तब्बल 39 मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवारच मिळालेले नाहीत. यात प्रामुख्यानं मुंबईचा समावेश आहे. 

मुंबईतील ३६ पैकी २८ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडून कुणीही उमेदवारी मागितलेली नाही. तर दुसरीकडं राज्यातील ४८ मतदारसंघात केवळ एकच उमेदवार इच्छूक म्हणून पुढे आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीकडे सगळ्यात जास्त इच्छूकांचे अर्ज आलेत. पश्चिम महाराष्ट्रातील एका-एका मतदारसंघात २०-२० उमेदवार इच्छूक आहेत.

१९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यावेळी पहिली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवली होती. त्यानंतर २००४ आणि २००९ ची निवडणूक काँग्रेसबरोबर आघाडी करून लढवली होती. त्यामुळं मागील दहा वर्षं आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादीला आपली ताकद अनेक मतदारसंघात वाढवता आलेली नाही. त्यामुळंच जरी स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटली तरी राष्ट्रवादीला सर्व मतदारसंघात उमेदवार मिळणं मुश्किल दिसतंय.

मुंबईत विधानसभेच्या सगळ्यात जास्त म्हणजे ३६ जागा आहेत. मात्र 15 वर्षं सत्तेत राहूनही, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत राष्ट्रवादीला आपला विस्तार करता आलेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.