शतकातील सर्वात मोठा धूमकेतू दिणार २७ नोव्हेंबरला!

By Surendra Gangan | Last Updated: Friday, November 8, 2013 - 17:17

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शतकातील सर्वात मोठा धूमकेतू `आयसॉन`चे लवकरच दर्शन होणार आहे. २७ नोव्हेंबरला सूर्योदयापूर्वी २० मिनिटे हा धूमकेतू दिसेल. त्यामुळे खगोलप्रेमींना धूमकेतू पाहाण्याची संधी मिळणार आहे.
ही धूमकेतू २८ नोव्हेंबर रोजी आयसॉन सूर्याच्या अगदी जवळ येणार असून त्याचे सूर्याच्या पृष्ठभागापासूनचे अंतर ११ लक्ष ६० हजार किलोमीटर इतके असेल. सूर्याच्या जवळ आल्याने आयसॉन धूमकेतूचे तापमान दोन हजार अंश सेल्सिअस होणार आहे. त्यामुळे अंतराळात घडणार्‍या घडामोडींकडे शास्त्रज्ञांचे लक्ष आहे, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.
यापूर्वी १९७६ मध्ये वेस्ट, १९८६ मध्ये हॅले, १९९७ मध्ये हेलबॉय या धूमकेतूंनी दर्शन दिले होते. २१ सप्टेंबर २०१२ यादिवशी नेवस्की आणि नोव्हीचोक्स या रशियन खगोल शास्त्रज्ञांनी आयसॉन धूमकेतूचा शोध लावला. त्यावेळी हा धूमकेतू शतकातील सर्वात मोठा धूमकेतू असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला होता.
कधी आणि कसा दिसणार धूमकेतू
- १७ नोव्हेंबर - पूर्वेला सूर्योदयापूर्वी सुमारे अडीच तास चित्रा तारकेजवळ दुर्बिणीतून दिसेल.
- यावेळी त्याची प्रत (तेजस्वीपणा) ४.७ एवढा असेल.
- २० नोव्हेंबर - आयसॉनची प्रत कमी होऊन ४ होईल.
- २६ नोव्हेंबर - एक प्रतीचा दिसेल.
- २७ नोव्हेंबर - सूर्योदयापूर्वी २० मिनिटे वजा ०.५ प्रतीचा दिसेल.
- २८ नोव्हेंबर - आयसॉनची प्रत वजा ८ असेल. मात्र, प्रखर सूर्यप्रकाशामुळे दिसणे कठिण आहे.
- १ डिसेंबर - सूर्योदयापूर्वी ४० मिनिटे १ प्रतीचा दिसेल.
- ५ डिसेंबर - ध्रुव तारीकेजवळ आयसॉन जाईल.
धूमकेतू म्हणजे काय?
बर्फ, धुलीकण आणि वायू यांचा गोळा म्हणजे धूमकेतू. हे गोळे सूर्यमालेबाहेर येतात आणि सूर्याला प्रदक्षिणा करून जातात. ज्यावेळी हे गोळे मंगळ कक्षा ओलांडतात त्यावेळी त्यांना पिसारा फुटतो. या पिसार्‍याचे पृथ्वीवरून विलोभनीय दर्शन घडते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 8, 2013 - 17:17
comments powered by Disqus