मनसे वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निधी आपल्या वॉर्डकडं!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, March 31, 2013 - 18:38

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेच्या विकासनिधी वाटपात मनसे वगळता सर्वपक्षीय पदाधिका-यांनी सर्वाधिक निधी आपल्या वॉर्डकडं वळवलाय. यामुळं सामान्य नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनीही मोठा निधी मिळवल्यानं या गोष्टीला म्हणावा तसा विरोध झाला नाही. मनसेनं मात्र हा मुद्द उचलून धरला होता.
मुंबई महापालिकेत सध्या विकासनिधीच्या असमान वाटपावरुन सामान्य नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना दिसून येतंय. मनसे वगळता सर्वच पक्षाच्या वजनदार नगरसेवकांनी कोट्यवधींचा विकासनिधी आपल्या वॉर्डकडं ओढून घेतला. तर दुसरीकडं सामान्य नगरसेवकांची मात्र काही लाखांच्या विकासनिधीवर बोळवण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सर्वाधिक विकासनिधी आपल्याकडं वळवून घेण्यात यशस्वी ठरलेत ते स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे. त्यांनी आपल्या वॉर्डसाठी तब्बल 2 कोटी 95 लाखांचा निधी वळवला. काँग्रेसचे मनपा विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम दीड कोटी रुपये, महापौर सुनिल प्रभू 1 कोटी 39 लाख रुपये तर अणुशक्तीनगरमधून पहिल्यांदाच नगरसवेक झालेल्या शिवसेनेच्या मंजू कुमारे यांनी राहुल शेवाळेंच्या आशीर्वादानं 1 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मिळवलाय. भाजपचे शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल खरटमोल 1 कोटी 10 लाख आणि राष्ट्रवादीच्या धनंजय पिसाळ यांनी 1 कोटींचा निधी मिळवण्यात यश मिळवलंय.

मनसेचा आरोप धुडकावून लावत प्रशासकीय कामांच्या मंजुरीप्रमाणं निधीचे वाटप झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय. विरोधी पक्षांतील महत्वाच्या नेत्यांच्या पदरी अधिक निधीचे दान टाकून सत्ताधाऱ्यांनी त्यांची नाकाबंदी केली. परिणामी तुटपुंज्या निधीमुळं सामान्य नगरसेवक नाराज असले तरी नेत्यांची तोंडं बंद असल्यानं ते आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही करु शकत नाहीत.

First Published: Sunday, March 31, 2013 - 18:38
comments powered by Disqus