पवार-मुख्यमंत्र्यांची शब्दखेळी बिल्डरांशी संबंधीत?

शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सध्या सुरु असलेले आरोप - प्रत्यारोप हे पुण्या-मुंबईतल्या बिल्डरांशी संबधित असल्याची शंका भाजपनं व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2013, 11:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सध्या सुरु असलेले आरोप - प्रत्यारोप हे पुण्या-मुंबईतल्या बिल्डरांशी संबधित असल्याची शंका भाजपनं व्यक्त केलीय. दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून ते अर्धवट सोडून न देता त्यांचा खुलासा होणं गरजेचं असल्याचं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलंय.
आबा म्हणतात, मीडियानं वाद वाढवू नये
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच टीकेचा वार केला होता. ‘फायलींवर सह्या करण्यासाठी हात थरथरतात. यांना लकवा मारलंय का?’ असा भडिमार पवारांनी केला तर ‘पवारांना योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर देऊ’, असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला. पवार आणि चव्हाण यांच्यातील या शाब्दिक चकमकीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा कटुता आलीय. या प्रकरणी राष्ट्रवादी काहीशी बॅकफुटवर गेल्याचे जाणवले. अजित पवारांनी याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. तर ‘मीडियाने हा वाद जास्त वाढवू नये’ असा सल्ला गृहमंत्री आर. आर. पाटलांनी दिलाय.

कोणत्या फायलींबद्दल सुरू आहे हा वाद?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र पवारांची बाजू उचलून धरली. लकवा मारलाय म्हणजे प्रशासनाची गती मंदावलीय, असा अर्थ मलिका यांनी काढला. यानिमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही वादात उडी घेतलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखत्यारीतील वित्त खात्यामुळेच फायली रखडतात, अशी टीका ठाकरेंनी केलीय.
काँग्रेस-राष्ट्रवादीतला हा कलगीतुरा आता कोणत्या थराला जातोय आणि पवारांना उत्तर देण्याची मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष टिकून आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.